हिवाळा आल्यानंतर पहाटे रस्त्यांवरुन धावणाऱ्या वाहनांचा वेग आपोआप कमी होतो. हिवाळ्यात दाट धुकं पडल्याने वाहनचालकांना फार लक्ष देऊन गाडी चालवावी लागते. धुक्यात दृष्टीमान कमी झाल्याने अपघाताचा धोका असतो. दरम्यान अशावेळी फक्त बाहेरच नाही तर कारच्या आतही विंडशिल्डवर धुकं जमा होतं. ज्यामुळे वाहनचालकांच्या अडचणीत आणखी वाढ होते. अनेक चालक वारंवार कपड्याने काच पुसत असतात. पण काही वेळाने पुन्हा एकदा काचेवर धुकं जमा होतं. अशावेळी वारंवार काच पुसणं त्रासदायक ठरु शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विंडस्क्रीनवर धुकं जमा होऊ नये यासाठी कारमध्येच एक सुविधा देण्यात आलेली असते. पण अनेक लोकांना या सुविधेबद्दल माहितीच नसतं. थंडीत अनेक लोक कारमध्ये हीटर सुरु करुन वाहन चालवतात. ज्यामुळे समस्या आणखी वाढते. जाणून घ्या विंडस्क्रीनवरील धुकं हटवण्यासाठी नेमका योग्य उपाय काय आहे?


धुकं जमा झाल्यास करा हे काम


हिवाळ्यात, कारच्या विंडस्क्रीनवर आतून धुकं जमा होतं, कारण बाहेरचे तापमान कारच्या आतील तापमानापेक्षा कमी असते. त्यामुळे गाडीतील ओलावा थंड होऊन पाण्याच्या छोट्या थेंबात रुपांतर होऊन काचेवर गोठू लागतो. जेव्हा असं घडते, तेव्हा तुम्हाला बाहेरच्या गोष्टी दिसणं बंद होतं. थंडीपासून वाचण्यासाठी, बरेच लोक हीटर चालू ठेवून वाहन चालवतात, परंतु यामुळे आर्द्रता आणखी वाढते आणि काचवर अधिक धुके जमा होऊ लागते. अशा परिस्थितीत धुक्यापासून वाचण्यासाठी हिटर चालवणे योग्य नाही.


जर काचेवर धुकं जमा झालं तर हिटर नव्हे एसी ऑन केला पाहिजे. कारमधील तापमान जेव्हा बाहेरच्या तापमानाइतकं असतं तेव्हा काचेवर धुकं जमा होणं आपोआप बंद होईल. धुकं घालवण्यासाठी तुम्ही काही वेळासाठी एसी सुरु  करुन लगेच बंद करु शकता. प्रवासात काही काही वेळाने असं करत राहिल्यास धुकं अजिबात जमा होणार नाही. 


काच थोडी खाली ठेवल्यास धुकं जमा होणार नाही


जर तुम्हाला एसी लावायचा नसेल तर कारच्या खिडक्या थोड्या खाली करुन ठेवू शकता. असं केल्याने बाहेरील थंड हवा कारच्या आतमध्ये येत राहील. यामुळे कारमधील तापमान कमी होईल आणि काचेवर धुकं जमा होणार नाही. 


काचा साफ करुन घ्या


हिवाळ्यात कारची दृश्यमानता चांगली राहील याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. यासाठी आरसा नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. रस्त्यावरील कारची दृश्यमानता सुधारण्यासाठी, हेडलाइट्स किंवा फॉग लाइट्स लावून गाडी चालवा. याशिवाय, तुम्ही कारच्या पुढील आणि मागील बाजूस रिफ्लेक्टिंग स्टिकर्स चिकटवून दृश्यमानता वाढवू शकता.