प्रीपेड सीमकार्डसाठी आता किमान रिचार्ज बंधनकारक
या सक्तीच्या रिचार्जमुळे मोबाईल ग्राहकांच्या खिशावर भार पडणार आहे.
मुंबई : प्रीपेड मोबाईल धारकांसाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. यापुढे प्रीपेड मोबाईल धारकांना खिसा हलका करावा लागणार आहे. नाहीत तर इनकमिंग सोबत आऊटगोईंगही बंद होणार आहे. मोबाईल कंपन्यांनी हा निर्णय घेतलाय. निर्णय घेतलाय की लादलाय ? याबाबत प्रीपेड मोबाईल धारकांमध्ये सध्या तरी संतापाचं वातावरण आहे. काही मोबाईल कंपन्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या युझर्सच्या संख्येवर काय परिणाम होतो हे येणाऱ्या दिवसात कळेलच.
रिचार्जचा बोजा
प्रीपेड मोबाईल धारकांना यापुढे दर महिन्याला किमान 35 रुपये किंमतीचे रिचार्ज करणे सक्तीचे करण्यात आले आहे. जे कोणी किमान रिचार्ज करणार नाहीत, त्यांच्या इनकमिंग आणि आऊटगोईंग सुविधा बंद करण्याचा निर्णय काही मोबाईल कंपन्यांनी घेतलाय.
त्यामुळे आतापर्यंत कोणताही रिचार्ज न करता, प्रीपेड सीम कार्डावर इनकमिंग सुविधेचा फायदा घेणाऱ्या सामान्य ग्राहकांवर आता रिचार्जचा बोजा पडणार आहे.
विविध प्रतिक्रिया
या निर्णयानंतर शहरी भागातील ग्राहकांवर विशेष ताण पडणार नसला तरीही ग्रामीण भागातल्या नागरिकांना आणि वयोवृद्ध मंडळींना या सक्तीचा भार पडणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणाई या निर्णयावर नाराज असलेली पाहायला मिळत आहे.