स्टीव्ह जॉब्सच्या मुलीनेच उडवली Apple iPhone 14 ची खिल्ली, मीम शेअर करत म्हणाली...
अॅपलने बुधवारी iPhone 14 सीरीज लॉन्च केली आहे
अॅपलने बुधवारी संध्याकाळी iPhone 14 सीरीज लॉन्च केली असून नवीन मॉडेल्स चर्चेत आहेत. या फोनसोबत कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स हेही चर्चेत आहेत. अनेक आयफोन युजर्सचे म्हणणे आहे की नवीन आयफोन 14 मागील वर्षी लॉन्च केलेल्या आयफोन 13 पेक्षा फारसा वेगळा नाही. मात्र स्टीव्ह जॉब्स यांच्या मुलगी इव्हने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका मीममुळे जोरदार चर्चा सुरु आहे.
24 वर्षीय इव्ह जॉब्सने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये अॅपल आयफोनशी संबंधित एक मीम शेअर केला आहे. या मीममध्ये एक व्यक्ती तेच शर्ट विकत घ्यायला गेली आहे तोच त्याने घातलेला दाखवण्यात आलं आहे. "आज Apple च्या घोषणेनंतर iPhone 13 वरून iPhone 14 वर अपग्रेड करत आहे, असे कॅप्शन त्याच्यासोबत दिलं आहे. त्यामुळे दोन्ही आयफोन मॉडेल एकमेकांपेक्षा फारसे वेगळे नाहीत असं सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
Apple iPhone 14 लॉन्चशी संबंधित एक मीम शेअर केलेली इव्ह एकटीच नाही. सोशल मीडियावर आयफोन लॉन्चनंतर अनेक यूजर्सनी मजेशीर मीम्स शेअर करायला सुरुवात केली आहे.
डिझाइनच्या बाबतीत फारसा फरक नाही
आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस या दोन्हींचे डिझाइन गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या आयफोन 13 पेक्षा फारसे वेगळे नाही. या मॉडेलच्या डिस्प्लेवर पूर्वीप्रमाणेच नॉच मिळत आहे आणि iPhone 13 प्रमाणे A15 बायोनिक चिप देखील देण्यात आली आहे. बऱ्याच युजर्सना आयफोन 13 वरून आयफोन 14 वर अपग्रेड करण्यात काही अर्थ नसल्याचं वाटतंय.
दरम्यान, अॅपलचा दावा आहे की, आयफोन 14 मध्ये एक चांगला कॅमेरा सेन्सर आहे. मागील पॅनलवर 12MP चे दोन सेन्सर देण्यात आले आहेत, ज्याच्या मदतीने कमी प्रकाशात चांगली फोटोग्राफी होते. त्याचबरोबर कंपनीने सेल्फी कॅमेरा देखील अपग्रेड केला आहे. अॅपलने असेही म्हटले आहे की आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस दोन्हीला पूर्वीपेक्षा चांगले बॅटरी आयुष्य मिळेल.