Tata चा अनोखा विक्रम! 4 महिन्यांत विकल्या गेल्या इतक्या Tiago EV कार्स; झाली 7 कोटींची बचत
Tata Tiago EV Sales: या गाडीच्या विक्रीची घोषणा झाल्यानंतर ही गाडी ‘फास्टेस्ट बुक्ड ईव्ही इन इंडिया’ ठरली होती. त्यानंतर आता कंपनीने या गाडीसंदर्भातील नवीन आकडेवारीची घोषणा केली आहे.
Tata Tiago EV Sales in India: टाटा मोटर्सने इलेक्ट्रीक व्हेइकल क्षेत्रात एक अनोखी कामगिरी केली आहे. भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाइल उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा मोटर्सने आपल्या टियागो ईव्ही व्हेरिएंटच्या 10 हजार युनिट्सची विक्री केल्याची माहिती दिली आहे. अवघ्या 4 महिन्यांमध्ये कंपनीने हा टप्पा गाठला असल्याने टियागो ईव्ही ही भारतीयांची आवडती इलेक्ट्रीक कार ठरल्याचं कंपनीने म्हटलं आहे. टियागो ईव्ही ‘फास्टेस्ट बुक्ड ईव्ही इन इंडिया’ ठरली होती. या गाडीच्या विक्रीची घोषणा झाल्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये 10 हजार बुकिंग्ज झाल्या होत्या. त्यानंतर डिसेंबर २०२२ पर्यंत 20 हजार युनिट्स बुक झाले.
7 कोटींची बचत
टियागो ईव्हीची देशातील एकूण 491 शहरांमध्ये विक्री झाली आहे. टियागोच्या या ईव्ही व्हेरिएंटमुळे वातावरणात 1.6 दशलक्ष ग्रॅम कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होण्यापासून रोखण्यात यश आल्याचा दावा कंपनीने केला आहे. विक्री करण्यात आलेल्या 10 हजार टियागो ईव्ही गाड्यांपैकी 1200 हून अधिक गाड्यांनी 3 हजार किमीहून अधिक प्रवास केला तर 600 हून अधिक गाड्यांनी 4 हजार किमीहून अधिक अंतर कापले आहे. या आकडेवारी गाडीचा दर्जा आणि सेवा उत्तम प्रतिची आहे हे दिसून येतं असं कंपनीचं म्हणणं आहे. ही ईव्ही विकत घेणाऱ्या ग्राहकांनी एकत्रितरित्या इंधनावरील खर्चाचे 7 कोटींहून अधिक रुपये वाचवले आहेत, असंही कंपनीने म्हटलं आहे.
चार्जिंगही दमदार
हाय-व्होल्टेज अत्याधुनिक झिप्ट्रॉन तंत्रज्ञानावर आधरित टियागो ईव्ही गाडीचे 5 युएसपी कार्यक्षमता, तंत्रज्ञान, विश्वसनीयता, चार्जिंग व आरामदायक अनुभव हे असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. टियागो ईव्ही आयपी 67 प्रमाणित बॅटरी पॅक्स (वॉटर आणि डस्ट रेझिस्टंट) आहे. या कारमध्ये दैनंदिन लांबच्या प्रवासासाठी 315 किमीची मोडिफाइड इंडियन ड्रायव्हिंग सायकल (एमआयडीसी) रेंज देणारा 24 केडब्ल्यूएच बॅटरी पॅक आणि लहान व कमी अंतराच्या ट्रिप्ससाठी 250 किमीची अंदाजित एमआयडीसी रेंज देणारा 19.2 केडब्ल्यूएच बॅटरी पॅक दिलेला आहे. लिक्विड कूल्ड बॅटरी व मोटर 8 वर्ष किंवा 1,60,000 किमी वॉरंटीसह येते. 'सुलभ चार्जिंग' पर्यायाअंतर्गत टियागो ईव्ही 4 विभिन्न चार्जिंग सोल्यूशन्ससहीत उपलब्ध आहे. ही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे...
- कुठेही, कधीही चार्जिंगसाठी १५ अॅम्पियर प्लग पॉइण्ट
- प्रमाणित 3.3 केडब्ल्यू एसी चार्जर
- 7.2 केडब्ल्यू एसी होम फास्ट चार्जर, जो फक्त 30 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 35 किमी अंतरापर्यंत प्रवासासाठी गाडी चार्ज करु शकतो. तसेच ३ तास ३६ मिनिटांमध्ये कारची संपूर्ण चार्जिंग (10 टक्क्यांपासून 100 टक्क्यांपर्यंत) होऊ शकते.
- डीसी फास्ट चार्जिंग फक्त 30 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 110 किंमी अंतरापर्यंत प्रवासासाठी गाडी चार्ज करु शकते आणि फक्त 57 मिनिटांमध्ये वेईकलला 10 टक्के ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकते.
किंमत किती?
या गाडीची मुंबईमधील ऑन रोड प्राइज ही 9 लाख 16 हजारांपर्यंत जाते तर एक्स शोरुम प्राइज ही 8 लाख 69 हजार इतकी आहे.