`टाटा`ने विकत घेतला `फोर्ड`चा कारखाना! ग्राहकांनाही होणार फायदा
विशेष म्हणजे या अधिग्रहणानंतर `फोर्ड`मधून `टाटा` कंपनीचे कर्मचारी झालेल्यांना `टाटा`कडून `फोर्ड`प्रमाणेच सर्व सुविधा पुरवल्या जाणार आहेत. या अधिग्रहण व्यवहारासाठी टाटा मोर्टर्सने 725 कोटी 70 लाख रुपये खर्च केले आहेत.
देशातील सर्वात मोठी पॅसेंजर इलेक्ट्रिक व्हेइकल कंपनी अशी ओळख असलेल्या 'टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड'ने मंगळवारी अधिकृतरित्या अमेरिकेतील वाहन निर्मिती क्षेत्रातील 'फोर्ड' कंपनीचा कारखाना ताब्यात घेतला. फोर्ड कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचा दोन्ही कंपन्यांमधील व्यवहार पूर्ण झाला आहे. हा कारखाना गुजरातमधील साणंद येथे आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच 'बीएसई'ला टाटा कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 'फोर्ड'बरोबरचा साणंद प्रॉपर्टी, वीएम प्लाँट आणि मशीन्सच्या हस्तांतरणाचा व्यवहार पूर्ण झाला आहे.
ते कर्मचारी होणार टाटाचे कर्मचारी
'फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड'च्या ज्या कर्मचाऱ्यांनी हा हस्तांतरणाला पाठिंबा दर्शवला आहे ते मंगळवारपासून टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे कर्मचारी म्हणून कामावर रुजू झाले. विशेष म्हणजे या अधिग्रहणानंतर 'फोर्ड'मधून 'टाटा' कंपनीचे कर्मचारी झालेल्यांना 'टाटा'कडून 'फोर्ड'प्रमाणेच सर्व सुविधा पुरवल्या जाणार आहेत. या अधिग्रहण व्यवहारासाठी टाटा मोर्टर्सने 725 कोटी 70 लाख रुपये खर्च केले आहेत.
चार लाख 20 हजार गाड्या तयार करणार
भारताबरोबरच जगभरामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता आता 'टाटा मोटर्स'ने या क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केलं आहे. भारतामधील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील मोठा वाटा यापूर्वीच टाटांकडे आहे. फोर्डचा कारखाना ताब्यात घेतल्यानंतर आता टाटा कंपनी आपल्या वार्षिक निर्मितीमध्ये वाढ करणार आहे. तीन लाख गाड्यांच्या निर्मितीचं उद्देश समोर ठेवलेल्या टाटा कंपनीने या व्यवहारानंतर आता ही क्षमता चार लाख 20 हजार गाड्यांपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे.
ग्राहकांना होणार हा फायदा
टाटा मोटर्स सध्या नेक्सॉन इव्ही, टीगोर ईव्ही आणि नुकतीच बाजारात आणलेली टायगोर ईव्ही यासारख्या इलेक्ट्रिक गाड्या विकते. ऑटो एक्सपो 2023 मध्ये कंपनीने नव्या इलेक्ट्रिक गाड्यांची घोषणा केली आहे. या ऑटो एक्स्पोमध्ये टाटा कंपनीने पहिली झलक दाखलेल्या इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये सफारी, हॅरियर, पंच यासारख्या गाड्यांबरोबरच अल्ट्रोजचाही समावेश होता. म्हणजेच भविष्यात स्वस्त आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवण्याचा टाटाचा विचार आहे. कमी किंमतीत इलेक्ट्रिक गाड्या उपलब्ध करुन देणाऱ्या कंपन्यांच्या स्पर्धेत सध्या तरी टाटाच्या आजूबाजूलाही कोणी नाही.
टाटाचा दबदबा
टाटा मोर्टर्सकडे सध्या देशातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील सर्वात मोठी हिस्सेदारी आहे. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात टाटाला आव्हान देणारी एकही कंपनी सध्या अस्तित्वात किंवा टाटांच्या आसपासही नाही. मारुती सुजुकी भारतामध्ये 2025 पर्यंत इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये उतरणार नाही असं चित्र दिसत आहे. हुंडाई आणि किआ मोटर्ससारख्या कंपन्याच्या इलेक्ट्रिक गाड्यांची किंमत ही 40 ते 50 लाखांदरम्यान आहे. मात्र 'एमजी मोटर्स' आणि 'सिट्रॉन'सारख्या कंपन्या स्वस्त इलेक्ट्रिक कार्स लॉन्च करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.