Twitter Revenue : टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या हातात आल्यानंतरही ट्विटरची (Twitter) स्थिती सुधारलेली नाही. उलट परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. ट्विटरची वाईट अवस्था पाहून ते विकत घेण्यासाठी तब्बल 44 अब्ज रुपये खर्च करणारे इलॉन मस्कही नाराज झाले आहेत. मस्क यांच्या सर्वोत्तम प्रयत्नानंतरही कंपनीचे उत्पन्न निम्म्यावर आले आहे. मस्क यांनीही याबाबत माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरने ब्लू सबस्क्रिप्शन सुरू केले होते. ज्यासाठी ट्विटर चालवण्यासाठी दरमहा सुमारे 800 रुपये घेतले जातात. तसेच, ट्विटरचा खर्च कमी करण्यासाठी इलॉन मस्क यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात देखील करण्यात आली. मात्र मस्क यांच्या सगळ्या युक्त्या फोल ठरल्याचं दिसतं आहे. मस्क यांचा खर्च वाढत आहे, तर दुसरीकडे ट्विटरवर कर्जाचा बोजा वाढत आहे.


महिन्याला भरावे लागतात 1 हजार कोटी


इलॉन मस्कने 10 महिन्यांपूर्वी ट्विटर विकत घेतले. पण आता ट्विटरच्या जाहिरातींच्या कमाईत जवळपास 50 टक्क्यांची घट झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रचंड भारामुळे ट्विटरचे मोठे नुकसान होत आहे. इलॉन मस्कने ट्विटर विकत घेण्यासाठी खूप पैसे घेतले होते. अशातच इलॉन मस्क यांना ट्विटरचे व्याज म्हणून सुमारे 1.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच 12 हजार कोटी रुपये वार्षिक द्यावे लागत आहेत. म्हणजेच दरमहा मस्क यांना सरासरी 1 हजार कोटी रुपयांचे व्याज भरावे लागत आहे.


"जाहिरातींच्या निम्म्याहून कमी कमाईमुळे ट्विटरला मोठं नुकसान होत आहे. जाहिरातीच्या महसुलात जवळपास 50 टक्के घट आणि कर्जाच्या मोठ्या ओझ्यामुळे आम्ही अजूनही व्यवहारात नकारात्मक आहोत.आम्हाला हे सर्व बदलण्याची गरज आहे," असे इलॉन मस्क यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. यासोबतच 2023 मध्ये ट्विटर तीन अब्ज डॉलर कमाई करण्याच्या मार्गावर असल्याचेही मस्क यांनी म्हटले आहे.


थ्रेड्स आल्यानंतर वाढले संकट 


मे महिन्यात, ट्विटरने नबीसी युनिव्हर्सलच्या माजी जाहिरात प्रमुख लिंडा याकारिनो यांची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. ट्विटरसाठी जाहिरात विक्रीला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे, असे लिंडा यांनी सुरुवातीलाच सांगितले होते. अशातच आता ट्विटरसमोर नवा प्रतिस्पर्धी बाजारात आला आहे. फेसबुकच्या मालकीच्या मेटाने ट्विटरच्या धर्तीवर टेक्स्ट आधारित थ्रेड्स अॅप सादर केले आहे. मात्र, ट्विटरने याविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.