Sundar Pichai vs Satya Nadella On AI: आर्टीफिशीएल इंटेजिलन्सच्या मुद्द्यावरुन जगातील आघाडीच्या कंपन्या असलेल्या मायक्रोसॉफ्ट आणि गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक टोलवा टोलवी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. बिंग या सर्च इंजिनचं एआय पॉवर्ड व्हर्जन लॉन्च केल्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी आता गुगला यामधून प्रेरणा मिळेल अशा अर्थाचं विधान केलं होतं. खरं तर या दोन्ही कंपन्यांमध्ये स्पर्धा असताना या विधानावर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी उत्तर दिलं आहे. सुंदर पिचाई आणि सत्या नाडेला हे दोघेही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन्ही दिग्गज भारतीय वंशाचेच असून सध्या ते एकमेकांच्या आमने-सामने आलेत.


एआय पॉवर्ड बिंग लॉन्च झाल्यानंतर पिचाई काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या आर्टीफिशीएल इंटेजिलन्सच्या क्षेत्रात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. अनेक कंपन्या आपले प्रोडक्ट या तंत्रज्ञानाला सपोर्ट करणारे असतील याची काळजी घेत आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुगल आणि मायक्रोसॉफ्ट या दोन कंपन्यांमध्येही यावरुन स्पर्धा सुरु आहे. दरम्यानच्या काळातच मायक्रोसॉफ्टच्या नेतृत्वाखालील बिंग या सर्च इंजिनचं एआय पॉवर्ड व्हर्जन लॉन्च झाल्यानंतर याचा गुगलवर काय परिणाम होईल या प्रश्नाचं उत्तर थेट गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनीच दिलं आहे. आपण यापूर्वी कधीही दिलं नाही एवढ्या कटाक्षाने या तंत्रज्ञानाच्या संदर्भात कंपनीमध्ये लक्ष घालत आहोत, असं सांगितलं. एआयच्या बाबतीत आमची इतरांच्या तालावर नाचण्याची तयारी नसून आम्ही सुद्धा सज्ज असल्याचं पिचाई यांनी अधोरेखित केलं आहे.


बाहेरच्या गोंगाटाकडे दुर्लक्ष करा


"मला वाटतं यामध्ये तुम्ही चुकण्याचा एक मार्ग म्हणजे बाहेर सुरु असलेल्या गोंगाटाकडे लक्ष देणं आणि इतरांच्या तालावर नाचण्याचा प्रयत्न करणं," असं पिचाई म्हणाले. "मी याबाबत कायमच स्पष्ट धोरण ठेवलेलं आहे. माझ्या मते आम्हाला नेमकं काय करायचं आहे याची पूर्ण कल्पना आहे," असंही पिचाई यांनी सांगितलं.


मी याच क्षणाची वाट पाहत होतो


तर तुम्ही तुमच्या पद्धतीने मार्गक्रमण करत आहात? असा प्रश्न विचारण्यात आला असता पिचाई यांनी, "होय! अगदी बरोबर बोललात," असं उत्तर दिलं. पिचाई यांच्या या विधानाचा थेट संबंध मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी केलेल्या विधानाशी आहे. एआय तंत्रज्ञानाने युक्त बिंग सर्च इंजिन लॉन्च केल्यानंतर आता कंपन्या एआयच्या आधारावर एकमेकांशी स्पर्धा करत आहेत, असं नाडेला म्हणाले होते. त्यालाच आता पिचाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "आम्ही हे काम पूर्ण केलं आहे. आम्ही आजच्या दिवसापासून सर्चमध्ये स्पर्धा अधिक वाढवली आहे. माझ्यावर विश्वास ठेवा मागील 20 वर्षांपासून मी या क्षेत्रात आहे आणि याच क्षणाची  मी आतुरतेने वाट पाहत होतो," असं नाडेला म्हणाले.


आम्ही नाचायला भाग पाडलं


गुगलचा संदर्भ देताना नाडेला यांनी, "मला अपेक्षा आहे की आमच्या या संशोधनामुळे त्यांना नक्की यामधून (एआय बनवण्याच्या अडचणीतून) बाहेर यायला आवडेल आणि आम्ही सुद्धा या नव्या तंत्रज्ञानाच्या तालावर नाचू शकतो हे आम्हाला दाखवतील. तसेच मला हे लोकांना दाखवून द्यायचं आहे की आम्हीच त्यांना यावर नाचायला भाग पाडलं. ते जेव्हा असं करतील तेव्हा तो मोठा दिवस असेल," असं टोला नाडेला यांनी लगावला होता.


सतत स्पर्धा


तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कायमच स्पर्धा असते असं गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी मान्य केलं. "आपण स्पर्धा कायमच पाहतो. न थांबता नवीन शोध घेत राहिले तरच तुम्ही यात पुढे राहता. बरं हे कायम स्वरुपी सत्य आहे. आता याचा वेगही वाढला आहे. तंत्रज्ञानातील ट्रेण्ड अधिक वेगवान होत आहेत. त्यामुळे मला याचं फारसं आश्चर्य वाटतं नाही या गोष्टीचं," असंही पिचाई यांनी सांगितलं