TRAI : स्पॅम कॉल आणि टेली मार्केटिंगच्या निनावी कॉलमुळे त्रस्त झालेल्या लोकांची काही प्रमाणात यातून सुटका होणार आहे. ट्रायने मोठं पाऊल उचललं आहे.  स्पॅम कॉल आणि नोंदणी नसलेल्या टेलि-मार्केटिंग कंपन्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करत 2.75 लाख दूरध्वनी क्रमांक खंडित करण्यात आले आहेत. तर 50 कंपन्यांच्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायने  घेतलेल्या कठोर भूमिकेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.


भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने दूरसंचार कंपन्यांना रजिस्ट्रेशन नसलेल्या टेलि-मार्केटिंग कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले होते. बनावट कॉलमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. 2024 च्या पहिल्या सहामाहीत नोंदणी नसलेल्या टेलि-मार्केटिंग कंपन्यांविरुद्ध 7.9 लाखांहून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. बोगस नंबर वरुन येणाऱ्या कॉल्सना आळा घालण्यासाठी 13 ऑगस्ट 2024  ला सर्व टेलिकॉम कंपन्यांना कठोर सूचना जारी करण्यात आल्या होत्या . यात नोंदणीशिवाय टेली-मार्केटिंग फर्मवर तात्काळ अंकुश ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. कारवाई केल्यानंतर ट्रायने निवेदन जारी केलं आहे. 


या सूचना लक्षात घेऊन दूरसंचार कंपन्यांनी बनावट कॉलसाठी गैरवापर करण्याविरोधात कठोर पावले उचलली आहेत. 50 हून अधिक कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे तर 2.75 लाखांहून अधिक एसआयपी डीआयडी/मोबाइल नंबर/टेलिकॉम नंबर्स ब्लॉक केली आहेत. या निर्णयामुळे बनावट कॉल्स कमी होतील आणि ग्राहकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. TRAI ने सर्व दूरसंचार कंपन्यांना पारदर्शक काम करण्याचं आवाहन केलं आहे.

 

सायबर गुन्ह्याची तक्रार करण्याचा सल्ला

सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणूक यासारख्या प्रकरणांमध्ये नागरिकांनी दूरसंचार विभागाच्या (Department of Telecommunication) संचार साथी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या सुविधेचा (Chakshu Facility) लाभ घ्यावा. याशिवाय अशा संशयास्पद कॉल्सची माहिती सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर 1930 किंवा अधिकृत वेबसाइटला भेट देऊन देखील द्यावी असंही ट्रायने आवाहान केलं आहे.