...म्हणून अशा पद्धतीनं सुरक्षित ठेवा मोबाईल डाटा
असं न केल्यास....
प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करताना बी- टाऊनचं ड्रग्ज प्रकरण चव्हाट्यावर आलं. सेलिब्रिटींच्या चॅटमुळं या प्रकरणाचे धागेदोरे खऱ्या अर्थानं हाती लागले. तपास यंत्रणांनी मग, त्या रोखानं कारवाईही सुरु केली. पण, यामुळं मोबाईलमधील माहितीच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला.
मोबाईलमधील माहिती, पासवर्डच्या साथीनं सुरक्षित केलेला डाटा नेमका कसा शोधला जातो, असाच प्रश्न सर्वसामान्य मोबाईल धारकांना पडला आहे. मुळात क्लाऊडवरील कोणत्याही प्रकारचा डाटा हा सुरक्षित नसतो. कुणीही हॅकर हा डाटा शोधून काढू शकतो. ज्यामध्ये तपास यंत्रणांना ही माहिती शोधण्याचा अधिकार आहे. पण, अन्य कुणी तसं केल्यास हा गुन्हा ठरतो.
एंड टू एंड एन्क्रिप्शन या सुविधेमुळं युजर्सचे चॅट मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीला वाचता येत नाहीत. पण, कायद्याच्या मार्गानं सुरक्षा यंत्रणांना ही माहिती उपलब्ध होऊ शकते. त्यामुळं मोबाईलमधून कोणताही मेसेज, फोटो पाठवताना काळजी घेतली गेलीच पाहिजे.
मोबाईल डाटा कसा सुरक्षित ठेवावा?
- सार्वजनिक ठिकाणी वायफायचा वापर करु नये.
- सार्वजनिक ठिकाणच्या चार्जिंग सुविधा वापरू नयेत.
- अनोळखी इसमाला आपला फोन देऊ नये.
- अनोळखी व्यक्तीकडून आलेली लिंक किंवा मेसेज उघडू नये.
- बँक किंवा इतर महत्त्वाची माहिती क्लाऊडवर अपलोड करु नये.
- क्रेडिट आणि डेबिट कार्डचा फोटो काढून व्हॉट्सअप करु नये.
- पासवर्ड आणि इतर सुरक्षेने क्रमांक सेव्ह करु नयेत.
अगदी सोप्या शब्दांत सांगावं तर इंटरनेटची सुविधा असणारा कोणताही मोबाईल डाटा शंभर टक्के सुरक्षित नाही. हा डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी हार्ड डिस्कचा वापर करावा. किंबहुना पासवर्ड लक्षात न राहिल्यास एका वहीवर ते लिहून ठेवावेत हाच पर्याय उत्तम.