नवी दिल्ली :  भारत आणि चीन मधील तणाव चांगलाच वाढताना दिसत आहे. हा वाढता तणाव पाहता भारतात अनेक चिनी वस्तूंवर बहिष्कार देखील टाकण्यात येत आहे. दरम्यान केंद्र सरकार द्वारे सोमवारी Tiktok सोबत अन्य ५९ चिनी ऍप्स भारतात बॅन करण्यात आले आहेत. Tiktok बॅन होण्याचा सर्वाधिक फायदा चिंगारी ऍपला झाला आहे. आतापर्यंत ३० लाखांपेक्षा जास्त लोकांनी चिंगारी ऍप डाऊनलोड केलं आहे.  एवढचं नाही तर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील चिंगारी ऍप डाऊनलोड केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत चिंगारी ऍप डाऊनलोड केल्याची माहिती दिली आहे. त्यांनी यापूर्वी कधीही Tiktok चा वापर केलेला नाही. परंतु हा ऍप भारतीय असल्यामुळे त्यांनी पुढाकार घेतला आहे.


चिंगारी ऍप गेल्या वर्षी बंगळुरुमधील प्रोग्रामर बिस्वात्मा नायक आणि सिद्धार्थ गौतम यांनी तयार केले होते.  हा ऍप गुगल प्ले स्टोअरमध्ये अव्वल स्थानावर कार्यरत आहे. नायक यांनी सांगितले की, 'भारतीयांना यावेळी देशी आणि टिक-टॉक सारख्या ऍपची आवश्यकता आहे. ही गरज लक्षात घेत आम्ही हे ऍप तयार केलं आहे. अनेक गुंतवणूकदार आमच्या ऍपमध्ये रस दर्शवित आहेत.' असं ते म्हणाले. 


चिंगारी ऍपच्या माध्यमातून युजर नवे व्हिडिओ तयार करू शकतात. शिवाय मित्रांसोबत त्याचप्रमाणे अनोळख्या व्यक्तींसोबत देखील ऑनलाईन चॅटिंग करू शकतात. चिंगारी ऍप इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, पंजाबी, मल्याळम, तामिळ आणि तेलगू भाषांमध्ये उपलब्ध आहे..