विरोधानंतर `टिक-टॉक`नं हटवले ६० लाख आक्षेपार्ह व्हिडिओ
`टिक-टॉक`चे भारतात २० कोटी वापरकर्ते आहेत. देशातल्या महत्त्वाच्या १० भाषांमध्ये `टिक-टॉक` ऍप उपलब्ध आहे
मुंबई : भारताच्या 'कंटेन्ट गाईडलाईन्स'चं उल्लंघन करण्यावरून 'टिक-टॉक' या मोबाईल ऍपवर बरीच टीका झाली. त्यानंतर, अल्पावधीतच तुफान लोकप्रियता मिळवलेल्या 'टिकटॉक' या ऍपवरचे जुलै २०१८ नंतरचे तब्बल ६० लाख व्हिडिओज् हटवण्यात आले आहेत. सचिन शर्मा यांनी याबाबतची माहि्ती दिलीय. 'टिक-टॉक' इंडियाच्या सेल्स एन्ड पार्टनरशीप विभागाचेचे ते संचालक आहेत. काही व्हिडिओमुळे भावना दुखावल्या जाऊ शकतात. तर काही व्हिडिओंमुळे लहान मुलांच्या मनावरही विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्यानं, हा निर्णय घेतल्याचं शर्मा यांनी म्हटलंय. लहान मुलांवरही सर्रास 'टिक-टॉक' व्हिडिओ बनवले जातात. नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्याबाबतचे चांगलेच व्हिडिओ 'टिक-टॉक'वर यावे यासाठी प्रयत्नशील असल्याचं, यावेळी शर्मा यांनी स्पष्ट केलंय.
'टिक-टॉक'चे भारतात २० कोटी वापरकर्ते आहेत. देशातल्या महत्त्वाच्या १० भाषांमध्ये 'टिक-टॉक' ऍप उपलब्ध आहे. जुलै २०१८ पासूनचे वादग्रस्त व्हिडिओ हटवण्यात आले आहेत. यापुढे वादग्रस्त व्हिडिओ वापरकर्त्यांपर्यंत पोहचण्याआधीच हटवले जातील, असंही स्पष्ट करण्यात आलंय. यापुढे फक्त सकारात्मक व्हिडिओच प्रदर्शित होतील याची काळजी घेऊ, असंही शर्मांनी सांगितलंय.
बेकायदेशीर आणि अश्लील कंटेन्टमुळे 'टिक-टॉक' या मूळच्या चायनीज ऍपला भारतात जोरदार विरोध होतोय. चायनीज कंपनी 'बाईटडान्स'चं स्वामित्व असलेल्या या ऍपला नुकतंच भारत सरकारनं नोटीस धाडून २४ प्रश्नांची उत्तर देण्यास बजावलंय. 'बाईटडान्स'च्या म्हणण्यानुसार, भारतात हे ऍप आत्तापर्यंत २० करोडहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आलंय.