जिओ फोनसाठी अजून करावी लागणार प्रतिक्षा !
जिओ फोन २१ सप्टेंबरला डिलिव्हरी होणार असे सांगण्यात आले होते. परंतु, ही तारीख बदलून ऑक्टोबरमध्ये फोन मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
नवी दिल्ली : जिओ फोन २१ सप्टेंबरला डिलिव्हरी होणार असे सांगण्यात आले होते. परंतु, ही तारीख बदलून ऑक्टोबरमध्ये फोन मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जिओ मोबाईलच्या वाढत्या मागणीमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला.
२४ ऑगस्टपासून जियोच्या फोनची बुकींग चालू झाली. परंतु, अधिक प्रमाणात झालेल्या प्री बुकींगमुळे कंपनीला दोन दिवसातच प्री बुकींगची सुविधा बंद करावी लागली. पहिल्याच वेळेस ६० लाखांहून अधिक लोकांनी जिओ फोनसाठी बुकींग केले.
रिलायन्स जियोच्या ४जी फोनची डिलिव्हरी डेट प्रथम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ठरवण्यात आली होती. त्यानंतर ती वाढवून २१ सप्टेंबर करण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार, कंपनीने ही तारीख अजून पुढे ढकलली आहे. आता १ ऑक्टोबर २०१७ ला जिओ फोन उपलब्ध होईल, असे सांगण्यात येत आहे. जिओ युजर्ससाठी जिओ ४जी फोन मोफत देण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या फोनच्या बुकींगसाठी लोकांची झुंबड उडाली आहे.
तुम्ही देखील जिओ फोनचे प्री बुकींग केले असेल तर अधिक माहितीसाठी १८००८९०८९०० या नंबर वर फोन करू शकता. परंतु, या नंबरवर फोन करण्यासाठी तुम्हाला प्री बुकींगच्या वेळेस दिलेल्या जिओ नंबरवरूनच फोन करावा लागेल.
त्याशिवाय myJio अॅप द्वारे देखील तुम्ही त्यासंदर्भातील माहिती मिळवू शकता. त्यासाठी अॅप ओपन करून माय वाऊचर सेक्शन ओपन करा. तेथे तुम्हाला तुमचा फोन ट्रॅक करण्याचा ऑप्शन मिळेल. तिथून तुम्हाला ४जी फोनच्या डिलिव्हरी संदर्भात अधिक माहिती मिळेल.