TVS कंपनीची आकर्षक क्रुझर मोटारसायकल लवकरच होणार लाँच! बाइकप्रेमींमध्ये उत्सुकता
टीव्हीएस कंपनीच्या नव्या क्रुझर मोटारसायकलबाबत बाइकप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
मुंबई: टीव्हीएस कंपनीच्या नव्या क्रुझर मोटारसायकलबाबत बाइकप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. टीव्हीएस कंपनीने 2018 ऑटो एक्स्पोमध्ये Zeppelin R क्रुझर मोटरसायकलचं कॉन्सेप्ट मॉडेल सादर केलं होतं. तेव्हापासून या बाईकची जोरदार चर्चा होती. मोटारसायकल लवकरच लाँच केली जाईल, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. कॉन्सेप्ट मॉडेल हाय-टेक माइल्ड हायब्रिड इंजिनसह प्रदर्शित करण्यात आले होते. या मॉडेलमध्ये टीव्हीएस अपाचे सीरीजमधील इंजिन वापरण्याची शक्यता आहे. या गाडीच्या किमतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Zeppelin R नावाचा ट्रेडमार्क
टीव्हीएसने भारतीय बाजारासाठी Zeppelin R हे नाव आधीच ट्रेडमार्क केले आहे. कंपनीने ही बाइक लाँच करण्यात स्वारस्य दाखवत आहे. चाचणी दरम्यान या मोटरसायकलचा एकही प्रोटोटाइप आतापर्यंत दिसला नाही. त्यामुळे लाँचबाबत अजूनही अस्पष्टता आहे. नवीन Zeppelin R बाइकचा लूक आकर्षक आहे. या बाइकला सिंगल पीस सीट देण्यात आली आहे. Zeppelin R ला एक लवचिक हँडलबार आणि स्पोर्टी राइडिंग पोस्चर देण्यात आले आहे.
ड्युअल-चॅनल ABS!
कॉन्सेप्ट मोटारसायकलमध्ये वायर स्पोक व्हील देण्यात आले होते. याशिवाय दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेकसह ड्युअल-चॅनल एबीएस देखील देण्यात आले होते.असं असलं तरी उत्पादन मॉडेलमध्ये काही बदल केले जाऊ शकतात. नवीन मोटरसायकलमध्ये 220 सीसी माइल्ड हायब्रिड इंजिन मिळू शकते. तसेच कंपनी अपाचे RR310 मधून घेतलेल्या बाइकला 312 cc इंजिन देऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. या इंजिनसह Zeppelin R ची स्पर्धा होंडा, रॉयल एनफिल्ड आणि जावा यांच्याशी होणार आहे.