मे महिन्यात मोबाईलवरुन 14 लाख कोटी झाले ट्रान्सफर; 2 हजारांच्या नोटबंदीचा परिणाम
UPI Scales New Peak In May 2023: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे रोजी 2 हजारांच्या नोटा चलनामधून मागे घेण्यासंदर्भातील घोषणा केल्यानंतर पुढील 10 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑनलाइन म्हणजेच UPI च्या माध्यमातून व्यवहार झाले.
UPI Scales New Peak In May 2023: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मे महिन्यामध्ये 2 हजार रुपयांच्या (2000 Rs Note) नोटा मागे घेण्यासंदर्भातील महत्त्वाची घोषणा केली. 2 हजारांच्या नोटबंदीची देशभरामध्ये चर्चा झाली. मात्र याच घोषणेमुळे मे महिन्यामध्ये डिजीटल व्यवहारांमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. युपीआयच्या (UPI Payments) माध्यमातून मे महिन्यात झालेल्या व्यवहारांची थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे. युपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये झालेली वाढ ही फारच मोठी असल्याचं युपीआय व्यवहारांवर देखरेख ठेवणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्परेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) म्हटलं आहे.
किती वेळा भारतीयांनी वापरलं UPI
युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच युपीआयच्या माध्यमातून मे महिन्यात झालेले व्यवहार हे आतापर्यंत कोणत्याही महिन्यात झालेले सर्वाधिक रक्कमेचे व्यवहार ठरले आहेत. मे महिन्यात युपीआयवरुन एकूण व्यवहार (in terms of volume) हे 941 कोटी व्यवहार झाले आहेत. म्हणजेच भारतीयांनी 941 कोटी वेळा युपीआयचा वापर करुन व्यवहार केले. किंमतीच्या बाबतीत (in terms of value) एकूण 14.3 लाख कोटींचे व्यवहार मे महिन्यात युपीआयवरुन झाले आहेत. मागील महिन्याच्या तुलनेत ही वाढ 2 टक्के अधिक आहे अशी माहिती एनपीसीआयने दिली आहे.
शेवटच्या 10 दिवसांमध्ये मोठ्याप्रमाणात वापर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे रोजी 2 हजारांची नोट मागे घेण्यासंदर्भातील नोटीस जारी केली. त्यामुळे शेवटच्या 10 दिवसांमध्ये ऑनलाइन माध्यमातून 3.96 लाख कोटी रुपयांचे व्यवहार युपीआयवरुन झाल्याचं एनपीसीआयचं म्हणणं आहे. मागील वर्षीच्या म्हणजेच 2022 च्या मे महिन्याच्या तुलनेत 58 टक्के अधिक व्यवहार यंदांच्या मे महिन्यात झाले आहेत. आरबीआयने 2 हजार रुपयांची नोटा मागे घेण्यासंदर्भातील निर्देश जारी केल्यानंतर हे व्यवहार वाढल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे 2016 साली झालेल्या नोटबंदीनंतरच भारतामध्ये युपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढू लागला. ऑनलाइन माध्यमातून व्यवहार करण्याचं प्रमाण भारतामध्ये मागील 6 ते 7 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.
नोटा बदलून देण्याचे निर्देश
2 हजारांच्या नोटा मागे घेतल्या जात असल्याची घोषणा केल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरने 1 हजारांची नोट पुन्हा चलनात येणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा बदलून घेण्याचं आवाहन भारतीयांना केलं आहे. बँकांना 2 हजारांच्या नोटा बदलून देण्याचे निर्देश देण्याबरोबरच नव्याने 2 हजारांच्या नोटा ग्राहकांना देऊ नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एकावेळेस एका व्यक्तीला बँकेतून 2 हजारांच्या 10 नोटा बदलून दिल्या जातील. म्हणजेच एका वेळेस 20 हजार रुपये बदलून दिले जातील.