US Scientists Achieve Net Energy Gain In Fusion Reaction: दिवसोंदिवस पेट्रोल, डिझेल सारख्या अपरांपारिक ऊर्जा साठ्यांचा वापर वाढत आहे. त्यामुळेच आता पर्यायी ऊर्जेचा आणि खास करुन नैसर्गिक किंवा संशोधनाच्या माध्यमातून इंधन निर्माण करुन ऊर्जा मिळवण्याचे प्रयत्न जगभरामध्ये सुरु आहेत. अमेरिकेतील अशाच एका प्रयत्नाला यश आलं आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी ऊर्जेचा स्वच्छ स्त्रोत शोधण्याच्या प्रयत्न केला. फ्यूजन प्रतिक्रियेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या प्रयत्नाला यश आलं आहे. डिसेंबरपासून दुसऱ्यांदा अशाप्रकारे वैज्ञानिकांना या सर्वात स्वच्छ ऊर्जास्त्रोताच्या निर्मितीमध्ये यश आलं अशी माहिती 'लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरी'ने दिली आहे.


अहवालावर काम सुरु


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅलिफोर्नियामधील लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरीच्या प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी 30 जुलै रोजी नॅशनल इग्निशन फॅसिलिटी (NIF) मधील प्रयोगात फ्यूजन इग्निशन विघटनाची यशस्वी पुनरावृत्ती केलीय. डिसेंबर महिन्यात करण्यात आलेल्या अशा पहिल्या प्रयोगाच्या तुलनेत यंदा अधिक प्रमाणात ऊर्जा उत्पन्न करण्यात यश आल्याचं लॉरेन्स लिव्हरमोरच्या प्रवक्त्यांनी रविवारी दिलेल्या माहितीत स्पष्ट केलं आहे. या संशोधनाच्या अंतिम अहवालावर काम सुरु असल्याचंही प्रवक्त्यांनी सांगितल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.


सूर्याला अशीच ऊर्जा मिळते


न्यूक्लियर फ्यूजनमध्ये दोन अणू केंद्रके म्हणजेच (अटॉमिक न्युक्लीअस) एकत्र करून एक जड अणू केंद्रक (न्यूक्लीअस) तयार केला जातो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रचंड ऊर्जा बाहेर फेकली जाते. अशाच प्रकारच्या न्यूक्लियर फ्यूजनमुळे सूर्यात ऊर्जा निर्माण होते हे मागील अनेक शतकांपासून वैज्ञानिकांना ठाऊक आहे. मागील अनेक दशकांपासून अशाप्रकारे अशाप्रकारच्या फ्यूजनच्या माध्यमातून ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत. ग्लोबल वॉर्मिंगला तोंड देण्यासाठी सर्वात निर्मळ ऊर्जा स्त्रोताच्या शोधात असलेल्या मानवाला न्यूक्लियर फ्यूजनच्या माध्यमातून हा प्रश्न सुटू शकतो अशी अपेक्षा आहे. 


अमेरिका म्हणते महत्त्वाचा प्रयोग


जर न्यूक्लियर फ्यूजन प्रक्रियाच्या आसपास जाणारे तंत्रज्ञान अधिक प्रगत पद्धतीने विकसित करता आले तर ते फारच क्रांतिकारी ठरेल. असं झाल्यास औद्योगिक स्तरावर वीज निर्मितीसाठीही न्यूक्लियर फ्यूजन वापर करता येऊ शकतो असं सांगितलं जात आहे. अमेरिकेतील ऊर्जा विभागाने या प्रकल्पाला, " मागील अनेक दशकांमध्ये राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीच्या दिशेने भविष्यातील मार्ग अधिक सुखकर करणारा प्रमुख वैज्ञानिक प्योग आहे," असं म्हटलं आहे. शास्त्रज्ञांनी दोन हलके अणूंना घनतेच्या माध्यमातून जोडण्यासाठी लेसर फोकस करत ऊर्जेचा वापर केला. या लेझरमधील ऊर्जेपेक्षा अधिक ऊर्जा या न्यूक्लियर फ्यूजनमधून तयार झाल्याची माहिती अमेरिकन ऊर्जा विभागाने दिली. 


अशी ऊर्जा व्यावसायिकदृष्ट्या वापरण्याआधी...


या प्रयोगामध्ये प्रत्यक्ष सहभागी नसलेल्या अणू शास्त्रज्ञांनी, ही कामगिरी फार महत्त्वाची पायरी ठरु शकेल असं म्हटलं आहे. मात्र न्यूक्लियर फ्यूजनमधून निर्माण होणारी ऊर्जा व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध होण्याआधी बरेच प्रयोग करावे लागतील असंही शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.