लयभारी! 9 भारतीय 38 विदेशी भाषा बोलणारी शालू
शालूनं मात्र कमाल केली आहे. एक दोन नाही तर तब्बल 47 भाषा भडाभडा बोलून ती मोकळी झाली.
मुंबई : आपल्याला हिंदी, मराठी, इंग्रजी या पलिकडे एखादोन फार तर 10 एक भाषा सोडल्या तर एकसाथ वेगवेगळ्या भाषा बोलायला तितक्या उत्तम जमतीलच का याची ग्वाही आपण देऊ शकत नाही. पण शालूनं मात्र कमाल केली आहे. एक दोन नाही तर तब्बल 47 भाषा भडाभडा बोलून ती मोकळी झाली.
आता प्रश्न पडला असेल ही शालू कोण? तिला एवढ्या भाषा येतात तरी कशा? विज्ञान आणि तंत्रज्ञान सतत नव-नवीन शोध आणि प्रयोगांमुळे समोर येत आहे. एकापेक्षा जास्त गॅझेट समोर येत आहेत. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे आजकाल बर्याच क्षेत्रात रोबोटचा वापरही वाढत आहे. अभियंते आणि वैज्ञानिक सतत असे ऍडवान्स रोबोट बनवत आहेत जे कोणत्याही परिस्थितीत मानवांपेक्षा कमी दिसत नाहीत. अशाप्रकारे, उत्तर प्रदेशातील एका शिक्षकाने रोबोट तयार केला आहे जो 47 भाषा बोलतो.
या रोबोटचं नाव शालू आहे. शालू दिसायला मानवासारखी आहे. आयआयटी बॉम्बे कॅम्पसमध्ये स्थित केंद्रीय विद्यालयाच्या विज्ञान शिक्षकांनी 47 भाषांमध्ये बोलू शकेल असा रोबो तयार केला आहे. मानवांसारख्या दिसणाऱ्या या रोबोला 'शालू' असे नाव देण्यात आले आहे. ते तयार करणारे दिनेश पटेल म्हणाले की, हा रोबो हिंदी, इंग्रजी, मराठी, भोजपुरी, जर्मन आणि फ्रेंच यासह ४७ देशी-परदेशी भाषांमध्ये बोलू शकते. शालू ९ भारतीय आणि ३८ परदेशी भाषा बोलू शकते.
दिनेश पटेल (Dinesh patel) म्हणाले की, ते तयार करण्यास तीन वर्षे लागली आहेत. हा ह्युएनॉइड (Humanoid) पूर्णपणे भारतात बनविला गेला आहे आणि त्यातील सर्व उपकरणे स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करण्यात आली आहेत. शालू लोकांना ओळखू शकते आणि त्यांची नावे देखील लक्षात ठेवू शकते. हा रोबोट सामान्य प्रश्नांची उत्तरे देखील देऊ शकतो. 'शालू' रोबोट बनवणारे शिक्षक दिनेश पटेल म्हणाले की, सध्या तो एक नमुना स्वरूपात आहे. ते लवकरच याचे वर्जन-2 तयार करणार आहेत. पटेल यांना शाळेत घेऊन जाण्याची इच्छा आहे जेणेकरुन मुलेही अभ्यास करू शकतील आणि त्यांचे मनोरंजन होईल.