दुबईत पुराच्या पाण्यात बोटीप्रमाणे धावली Tesla कार; VIDEO पाहून नेटकरी आश्चर्यचकित
Dubai Rain: दुबईत मुसळधार पावसामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत अनेक गाड्या रस्त्यांवर पाण्यात अडकून पडल्या आहेत. पण अशा स्थितीतही टेस्ला कार पुराच्या पाण्यातून धावतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dubai Rain: दुबईत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. 16 एप्रिलला दुबईत तुफान पाऊस झाल्याने शहरं पाण्याखाली गेली आहेत. पाण्याचा निचरा करण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने रस्त्यांवर साचलेल्या पाण्याची पातळी कमी होताना दिसत नाही आहे. त्यातच सतत पाऊस आणि वादळ या संकटात भर पाडत आहेत. रस्त्यांवर अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत. काहींना तर वाहन तशीच सोडून सुरक्षित स्थळ गाठावं लागलं आहे. पण यादरम्यान टेस्ला कारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत टेस्ला कार पुरातही विना अडथळा धावताना दिसत आहे. ही टेस्लाची Model Y EV कार आहे.
टेस्लाच्या कारचा बोट मोड
दुबईत रस्त्यांवर पाणी साचलेलं असताना टेस्लाची कार मॉडल वाय ईव्ही (Model Y EV) त्यातून धावताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एकीकडे पाण्यात इतर गाड्या अडकून पडलेल्या असताना टेस्लाची कार मात्र पाण्यातून मार्ग काढत पुढे जाताना दिसत आहे. पाण्यात धावणारी कार पाहून नेटकरी हा टेस्ला कारचा बोट मोड असल्याचं म्हणत आहेत.
टेस्ला कार पाण्यात धावण्याची ही पहिलीच वेळ नाही. टेस्लाने खोल पाण्यातही आपल्या गाड्यांची चाचणी घेतली आहे. चीनमध्ये येणारी वादळं पाहता टेस्लाने मॉडेल 3 आणि मॉडेल वायची पाण्याखाली चाचणी केली. टेस्ला EV ही इलेक्ट्रिक मोटर्सवर आधारित कार आहे, जी इंटरनल कंबंशन इंजिनाशिवाय इतर कुठूनही आतमध्ये हवा घेत नाही. त्यामुळे टेस्लाची कार अशा रस्त्यांवर धावण्यास सक्षम बनते.
तसं पाहायला गेल्यास इलेक्ट्रिक गाड्यांना पाण्यात नेण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. जर इलेक्ट्रिक कार अशाप्रकारे पाण्यात नेली तर त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अशाप्रकारे ईव्ही पाण्यात नेणं दुर्घटनेला निमंत्रण ठरु शकतं.