मुंबई : प्रश्न मांडण्यासाठी, आपल्या हक्कांची मागणी करण्यासाठी तर कधी केवळ आपलं म्हणणं मांडण्यासाठी सोशल मीडिया आता तरुण नागरिकांचं हक्काचं व्यासपीठ बनलंय. अशाच एका जागरूक नागरिकानं एका पोलीस अधिकाऱ्याची दबंग सोशल मीडियाद्वारे सगळ्यांच्या समोर आणली... यानंतर या पोलिसावर कारवाईही करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत या पोलीस अधिकाऱ्याची दबंगगिरी पाहायला मिळाली. खाकी वर्दीतल्या पोलीस मग्रुर अधिकाऱ्यानं नियम आणि कायदे हे आपल्याला लागू नसतात, अशा मस्तीतच तो असल्याचं व्हिडिओतून दिसतंय. पण एका दुचाकीस्वारानं त्याचा हा माज उतरवला. मुंबईतल्या पोलीस अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या अधिकाऱ्यावर कारवाई करून मुंबई पोलिसांनीही त्याला चपराक लगावलीय. 



व्हिडिओमध्ये, रस्त्यातून दुचाकीवर प्रवास करणारा हा पोलीस अधिकारी वर्दीत दिसतोय. एक तर त्यानं हेल्मेट परिधान केलं नव्हतं... त्यातच त्यानं सिग्नल तोडून आपली गाडी पुढे दामटवली... आणि कहर म्हणजे याबद्दल त्याला प्रश्न विचारणाऱ्या नागरिकाला त्यानं 'तू काय पोलीस आहेस का? तुला मला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही' असं म्हणत उडवून लावलं.  



या तरुणानं हा व्हिडिओ 'rev it up' या सोशल मीडिया हॅन्डलवरून सगळ्यांच्या निदर्शनास आणला... त्यामुळे मुंबई पोलिसांना या व्हिडिओमुळे संबंधित पोलिसावर कारवाई करण्यास भाग पडलं.