जिओ इफेक्ट : एअरटेलनंतर आता वोडाफोनने आणलाय जबरदस्त प्लान
रिलायन्स जिओच्या कमी किंमतीतील प्लान्सनंतर आता सर्वच टेलिकॉम कंपन्या युजर्ससाठी एकापेक्षा एक जबरदस्त प्लान्स आणतायत.
मुंबई: रिलायन्स जिओच्या कमी किंमतीतील प्लान्सनंतर आता सर्वच टेलिकॉम कंपन्या युजर्ससाठी एकापेक्षा एक जबरदस्त प्लान्स आणतायत.
गेल्या काही दिवसांमध्ये एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी ३४९ आणि ५४९ रुपयांच्या प्लानमध्ये डेटा लिमिट वाढवली होती. आता वोडाफोनही आपल्या युजर्ससाठी बंपर ऑफर घेऊन आलीये. सध्या कंपनीने कोणताही नवा प्लान लाँच केलेला नाहीये. मात्र जुन्या पॅकमध्येच डेटा लिमिट दुपटीने वाढवलंय. याचा फायदा वोडाफोन युजर्सना होणार आहे.
जुना प्लान अपडेट झाल्यानंतर आता ३४८ रुपयांच्या रिचार्जवर युजरला अनलिमिटेड लोकल, एसटीडी कॉलसह रोमिंगमध्येही आऊटगोईंगची सुविधा मिळतेय.
याशिवाय दिवसाला तुम्हाला २ जीबी डेटा मिळत आहे. कंपनीने या प्लानची व्हॅलिडिटी २८ दिवस ठेवलीये. दरम्यान प्रत्येक टेलिकॉम कंपनीप्रमाणे वोडाफोनच्या प्लानमध्ये दिवसाला २५०हून अधिक फोन करता येणार नसल्याची अट कायम ठेवण्यात आलीये. याचाच अर्थ एका आठवड्यात एक हजाराहून अधिक कॉल करता येणार नाहीत.
जर तुमचे त्याहून अधिक कॉल झाले तर त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतील. याआधी वोडाफोनच्या ३४८ रुपयांच्या प्लानमध्ये दिवसाला एक जीबी डेटा मिळत होता. मात्र हा दुपटीने वाढवण्यात आलाय. वोडाफोनने याआधी ८४ दिवसांचा प्लान लाँच केला होता. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगसह रोमिंग फ्री कॉलिंगची सुविधा दिली जातेय. यात युजर्सला दररोज १ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो.
याशिवाय या प्लानमध्ये दिवसाला १०० मेसेजेस फ्री मिळतात. या प्लानची किंमत ५०९ रुपये आहे. तर वोडाफोनच्या ४५८ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सला ७० दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यात युजरला दिवसाला एक जीबी डेटा आणि अनवलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.