नवी दिल्ली - दोन व्यक्तींमधील संदेशाची देवाण घेवाण गोपनीय ठेवण्याचा व्हॉट्सऍपचा उद्देश अधिक मजबूत करण्यात येत आहे. त्यासाठी व्हॉट्सऍपने एक नवे फिचर नुकतेच सुरू केले. आतापर्यंत एखाद्याचा मोबाईल आपल्या हातात पडला आणि त्याचा पासकोड किंवा स्क्रिन कसा सुरू करायचा हे माहिती असेल, तर त्याच्या व्हॉट्सऍपमधील संदेशही आपण बघू शकत होतो. पण आता मोबाईलमधील व्हॉट्सऍपवर आलेले संदेश बघण्यासाठीही फिंगरप्रिंट लॉकची सुविधा देण्यात आली आहे. ज्यामुळे संबंधित ग्राहकच त्याच्या बोटांच्या ठशांच्या साह्याने व्हॉट्सऍप सुरू करू शकेल आणि त्यावर आलेले संदेश वाचू शकेल किंवा इतरांना संदेश पाठवू शकेल. कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीला व्हॉट्सऍपवर आलेले संदेश थेटपणे बघता येणार नाहीत. सध्या केवळ ऍपल (आयओएस) मोबाईलधारकांनाच ही सुविधा देण्यात आली आहे. WABetainfo या ट्विटर हॅंडलवर या नव्या फिचरची माहिती सर्वात आधी देण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या ग्राहकांकडे आयफोन एक्स किंवा त्यापेक्षा वरच्या श्रेणीतील आयफोन असेल, त्यांना फेसआयडी सुविधेच्या साह्यानेही व्हॉट्सऍप सुरू करता येईल. तर ज्यांच्याकडे आयफोन एक्सपेक्षा खालच्या श्रेणीतील आयफोन आहे, त्यांना फिंगरप्रिंट लॉक किंवा पासकोड (ठराविक कोड टाकून उघडणे) सुविधा देण्यात आली आहे. व्हॉट्सऍपमध्ये सेटिंग्जमध्ये गेल्यावर अकाऊंट आणि त्यानंतर प्रायव्हसीमध्ये ही सुविधा सुरू किंवा बंद करता येणार आहे. सध्या केवळ आयफोनमध्येच हे शक्य होणार आहे. ऍंड्रॉईड वापरकर्त्यांना ही सुविधा कधी देण्यात येईल, याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 



दरम्यान व्हॉट्सऍप स्क्रिन लॉक सुविधा सुरू केल्यानंतरही ग्राहक व्हॉट्सऍपवर आलेल्या एखाद्या संदेशाला त्याच स्थितीत उत्तर देऊ शकतात. त्याचबरोबर व्हॉट्सऍपवर आलेल्या कॉल्सलाही ते त्याच स्थिती उत्तर देऊ शकतात. म्हणजे यासाठी व्हॉट्सऍप स्क्रिन लॉक उघडण्याची गरज पडणार नाही. सेटिंग्जमध्ये जाऊन आपण हे फिचर सुरू केल्यावर ऍप एकदा बंद करून पुन्हा सुरू करावे लागेल. त्यानंतरच ही सुविधा सुरू होईल. 


स्टिकर पॅकमधून एखादे स्टिकर डाऊनलोड करण्याची सुविधाही व्हॉट्सऍपने सुरू केली आहे. एखादे स्टिकर हवे असेल, तर संपूर्ण स्टिकर पॅक डाऊनलोड करण्याची गरज पुढील काळात पडणार नाही. केवळ एक स्टिकरही डाऊनलोड करता येणार आहे. याही सुविधाचे ग्राहकांना उपयोग होईल.