Whatsappचं जबरदस्त फिचर; ग्रुप व्हिडिओ कॉलिंगमध्ये नवा बदल
व्हॉट्सअपकडून यूजर्ससाठी एक जबरदस्त फीचर लॉन्च करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. लोकं घरात असल्याने या काळात इंटरनेट, व्हॉट्सअप, फेसबुक या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. लोक आपापल्या घरात असले तरी अनेक जण एकमेकांशी फोनद्वारे, व्हिडिओ कॉलद्वारे जोडलेले आहेत. लॉकडाऊन काळात व्हॉट्सअपकडून यूजर्ससाठी एक जबरदस्त फीचर लॉन्च करण्यात आलं आहे. आता घरात बसून कोणत्याही एकाशी नाही तर अनेक लोकांशी गप्पा मारता येणार आहेत.
WhatsApp ग्रुप व्हिडिओ चॅट -
कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता कोणताही यूजर आपल्या कोणत्याही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लोकांशी व्हिडिओ चॅट करु शकतो. व्हिडिओ चॅटवेळी एकावेळी केवळ चारच व्यक्ती स्क्रिनवर दिसू शकतात. पण व्हिडिओ चॅट संपूर्ण ग्रुपशी करता येऊ शकतं. याबाबत कंपनीने ट्विट करुन माहिती दिली आहे.
असं करा ग्रुप व्हिडिओ चॅट -
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जाऊन व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा त्यानंतर ग्रुपमधील सर्व लोकांना नोटिफिकेशन जाईल. त्यानंतर यूजर आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही तीन लोकांना स्क्रिनवर पाहण्यासाठी निवडू शकतो. स्क्रिनवर केवळ 4 लोकच असले तरी ग्रुपमधील सर्व सदस्य व्हिडिओ चॅटमधून बोलू शकतात. व्हॉट्सअपचं नवं 2.20.108 हे व्हर्जन अपडेट करण्यात आलं होतं
दरम्यान, याआधी व्हॉट्सअपकडून काही निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसच्या कठीण परिस्थितीच्या काळात वाढत्या अफवा पाहता कंपनीकडून निर्बंध घालण्यात आले. आता व्हायरल मेसेज एकाहून अधिकाला पाठवता येऊ शकत नाही. यापूर्वी कोणत्याही मेसेजला कमीत कमी पाच यूजर्स किंवा ग्रुपमध्ये पाठवता येऊ शकत होतं. अफवांमुळे लोकांना होणाऱ्या त्रासातून वाचवण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.