व्हॉट्सऍपची नवी घोषणा, मेसेज फॉरवर्ड करण्यावर बंधने
व्हॉट्सऍप वापरणाऱ्यांची वैयक्तिक माहितीची सुरक्षितता आणि गोपनीयता या दोन्ही मुद्द्यांचा विचार करून या निर्णयाची व्हॉट्सऍपने अंमलबजावणी केली आहे.
नवी दिल्ली - अगदी नवख्या मोबाईल वापरकर्त्यापासून ते सरावलेल्या ग्राहकापर्यंत सगळेच जण ज्याचा सहजपणे वापर करतात ते म्हणजे व्हॉट्सऍप. स्मार्टफोन वापरणारा प्रत्येक ग्राहक व्हॉट्सऍप वापरतोच. पण व्हॉट्सऍपवर येणारे मेसेजस खातरजमा न करता अनेकांना फॉरवर्ड करण्याच्या भारतीय ग्राहकांच्या वृत्तीमुळे ऍप निर्मात्यांनी घेतलेला निर्णय आता कायमस्वरुपी अंमलात आणला जाणार आहे. व्हॉट्सऍपच्या माध्यमातून मेसेज एकाच वेळी फक्त पाच मोबाईल क्रमाकांवरच पाठवता येणार आहेत. व्हॉट्सऍप वापरणाऱ्यांची वैयक्तिक माहितीची सुरक्षितता आणि गोपनीयता या दोन्ही मुद्द्यांचा विचार करून या निर्णयाची व्हॉट्सऍपने अंमलबजावणी केली आहे.
गेल्यावर्षी जुलैमध्ये व्हॉट्सऍपने आलेला मेसेज पुढे पाठविण्यावर बंधने घातली होती. त्या संदर्भात वृत्तपत्रांमध्ये आणि इतर माध्यमांमध्ये जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. गेल्या सहा महिन्यांत या निर्णयाबद्दल वापरकर्त्यांकडून आलेल्या प्रतिक्रियांचा विचार करून हे निर्बंध आता सर्वच व्हॉट्सऍप ग्राहकांसाठी लागू करण्यात आले आहेत.
व्हॉट्सऍपवर आलेले मेसेज फॉरवर्ड करण्यावर निर्बंध लादण्यात आल्यामुळे जगभरात फॉरवर्ड मेसेजचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी झाले आहे, असे कंपनीने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. व्हॉट्सऍपच्या माध्यमातून आता केवळ पाच मोबाईल क्रमांकावर मेसेज फॉरवर्ड करता येणार आहेत. यामुळे व्हॉट्सऍपच्या माध्यमातून जवळच्या लोकांमधील संवाद आणखी दृढ होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. या आधी व्हॉट्सऍपवर आलेला मेसेज एकाचवेळी २० मोबाईल क्रमांकावर पाठवता येत होता.
व्हॉट्सऍप वापरताना ग्राहकांना काय अनुभव येतो आहे. याबद्दल आम्ही सतत ग्राहकांकडून माहिती घेतो आहोत आणि त्याप्रमाणे आवश्यक बदल करतो आहोत. व्हायरल होणाऱ्या चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या मजकुराला रोखण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत, असे कंपनीने म्हटले आहे. व्हॉट्सऍपची सुरुवात २००९ मध्ये झाली. २०१४ मध्ये फेसबुकने ही कंपनी विकत घेतली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार २०१८ च्या सुरुवातीला व्हॉट्सऍपच्या माध्यमातून १५ अब्ज ग्राहक रोज ६५ अब्ज मेसेजेसची देवाणघेवाण करत होते.