नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्ससाठी एक नवीन धमाकेदार फिचर घेऊन येत आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पेमेंट ऑप्शन जोडण्याची तयारी करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिसेंबर महिन्यापर्यंत हे फिचर लॉन्च होऊ शकतं. हे फिचर सुरू झाल्यावर तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील डिजिटल ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून रक्कम ट्रान्सफर करू शकता. 


व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फिचर बाबतीत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. आता एका नव्या रिपोर्टनुसार याबाबत माहिती मिळाली आहे. फॅक्टर डेलीच्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट फिचरवर गेल्या काही दिवसांपासून काम करत आहे आणि आता हे काम शेवटच्या टप्प्यात आहे. कंपनीने या अ‍ॅपमधून पेमेंट ऑप्शन देण्याची तयारी केली आहे. डिसेंबर महिन्यात हे फिचर सुरू होणार असल्याची चर्चा होत आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपच्या या फिचरची नोव्हेंबरमध्ये बिटा टेस्टींग होणार आहे. त्यानंतरच डिसेंबरमध्ये हे फिचर यूजर्ससाठी मिळेल. पेमेंट फिचरसाठी व्हॉट्सअ‍ॅप फायनॅन्शिअल संस्थांसोबत बोलणी करत आहे. हे फिचर लॉन्च झाल्यानंतर भारतातील अनेक डिजिटल वॉलेट कंपन्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. 


रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप या फिचरसाठी स्टेट बॅंक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बॅंकेसोबत बोलणी करत आहे. आतापर्यंत बॅंकेकडून याबाबतीत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये.