अश्विनी पवार /अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : तिकडे इंग्लंड, अमेरिकेत म्हणे पावसाचा मिनिटा-मिनिटाचा अंदाज सांगितला जातो... आणि आपल्याकडे? पाऊस येणार नाही, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला की छत्री घेऊनच बाहेर पडावं, असं गमतीनं म्हटलं जातं... पण खरंच असं आहे का? असेल तर का आहे? साधारणतः जून ते सप्टेंबर असे चार महिने भारतात नैऋत्य मौसमी वाऱ्यांनी आणलेला पाऊस बरसतो... हा पाऊस कधी येईल, किती येईल याचा अंदाज वारंवार वर्तवला जातो... पण अनेकदा या पावसाचे अंदाज चुकत असल्याचं दिसतं... आपण वापरत असलेली पावसाच्या अंदाजाची मॉडेल्स ही परिपूर्ण असल्याचा दावा हवामान तज्ज्ञ करतात. मात्र, मान्सून एकूणच बेभरवशी असल्यामुळे परदेशांइतका अचूक अंदाज वर्तवता येत नाही.


गणितं चुकतात... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतासारख्या देशांत प्रचंड भौगोलिक विविधता आहे. समुद्रकिनाऱ्यापासून ते हिमालयातल्या एव्हरेस्ट या जगातल्या सर्वोच्च शिखरापर्यंत... प्रत्येक भूभाग वेगवेगळ्या उंचीवर आहे... सह्र्याद्री, सातपुडासारख्या अनेक पर्वतरांगा आपल्या देशात आहेत... शेकडो लहानमोठ्या नद्या वाहतात... यामुळे देशाचा भूभाग, त्याचं तापमान भिन्नभिन्न आहे... जमिनींचे प्रकारही वेगवेगळे असल्यामुळे त्यात्या तापमानातही फरक असतो... या प्रत्येक लहानमोठ्या फरकाचा मान्सूनवर परिणाम होतो... हवेतला एखादा छोटासा बदल संपूर्ण गणित चुकवायला पुरेसा ठरतो. 


अंदाज अचूक होणार?


भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशातील हवामानात होणा-या गतीशील बदलांमुळे पावसाचा अंदाज लावणं तुलनेनं किचकट आहे... त्यातच युरोप किंवा अमेरिकेच्या तुलनेत आपल्याकडे पावसाची नोंद ठेवण्याची पद्धत ही फारच अलिकडची आहे... पावसाचा अंदाज बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मॉडेल्समध्ये ही जुनी आकडेवारी फार उपयुक्त असते... पण फार जुनी आकडेवारीच आपल्याकडे उपलब्ध नाही... अर्थात हवामान खातं आपल्या परीनं अचूक अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न करत असतंच... आगामी काळात हे अनुमान खरोखरच अचूक झालं, तर त्याचा फायदा निश्चितच होईल...