भारतातील लोकांची स्मार्टफोन मेमरी का झटकन होते फुल? `गूगल`नं दिलं उत्तर...
भारतातील स्मार्टफोन आणि इंटरनेट युझर्स दररोज सकाळी इतके गुड मॉर्निंगचे मॅसेज पाठवतात की देशातील ३० टक्के लोकांच्या फोनची मेमरी केवळ या मॅसेज आणि फोटोमुळेच फुल होऊन जाते. हा रंजक शोध लावलाय गूगलनं...
नवी दिल्ली : भारतातील स्मार्टफोन आणि इंटरनेट युझर्स दररोज सकाळी इतके गुड मॉर्निंगचे मॅसेज पाठवतात की देशातील ३० टक्के लोकांच्या फोनची मेमरी केवळ या मॅसेज आणि फोटोमुळेच फुल होऊन जाते. हा रंजक शोध लावलाय गूगलनं...
व्हॉटसअप, फेसबुक किंवा इतर माध्यमातून पाठवण्यात येणाऱ्या गुड मॉर्निंग, गुड नाईट किंवा सणासुदीच्या निमित्तानं शुभेच्छा देणारे मॅसेज आणि फोटो पाठवण्याचा ट्रेन्ड भलताच वाढताना दिसतोय. याच विषयावर गुगलनं अभ्यास करून अहवाल तयार केलाय.
या अहवालानुसार, भारतातील प्रत्येक तीनपैंकी एक स्मार्टफोन युझरची मेमरी या गुड मॉर्निंग मॅसेजेसमुळेच फुल होतेय. गुड मॉर्निंग मॅसेज पाठवण्याचा हा ट्रेन्ड अमेरिकेतही भारतापेक्षा कमी आहे. अमेरिकेत केवळ १० टक्के युझर्स असे आहेत ज्यांची फोन मेमरी 'गुड मॉर्निंग' मॅसेजेसनं भरलेली आहे.
हाच का तो मोदींचा 'डिजीटल इंडिया'?
गेल्या पाच वर्षांत असे मॅसेज पाठवण्याचा ट्रेन्ड भलताच फॉर्ममध्ये आलाय. स्वस्त फोन आणि इंटरनेट प्लाननं यात महत्त्वाची भूमिका निभावलीय. इतकंच नाही तर भारत जगातील सर्वात जास्त इंटरनेट युझर्स असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरलाय. इथं ४० करोडहून अधिक इंटरनेट युझर्स, ३० करोड स्मार्टफोन युझर्स आहेत. हे आकडे पाहता हाच का तो पंतप्रधान मोदींचा 'डिजीटल इंडिया'? असाही प्रश्न कदाचित तुम्हाला पडू शकतो.
फेसबुकचं स्पेशल फिचर
गुड मॉर्निंग मॅसेजेसची लोकप्रियता इतकी वाढली की गेल्या वर्षी फेसबुकनं होम पेजवर एक स्पेशल फीचर जोडलं होतं. या माध्यमातून एखादा युझर आपल्या मित्रमैत्रिणींना 'गुड मॉर्निंग' म्हणत शुभेच्छा देऊ शकतो.
'गूगल'नं घेतला धसका
गुड मॉर्निंग मॅसेजेसचा ट्रेन्ड इतका वाढलाय की गूगलनं त्याचा धसकाच घेलाय. या पद्धतीचे मॅसेजेस थांबवण्यासाठी एक खास अॅप बनवलंय. गुगलनं डिसेंबर महिन्यात 'फाईल्स गो' नावाचं अॅप लॉन्च केलं. फोन मेमरीमधले गुड मॉर्निंग मॅसेज आणि फोटो ओळखून स्वत:च हे मॅसेज डिलीट करण्यासाठी 'फाईल्स गो' डिझाईन करण्यात आलंय.