रंग, मॉडेल, फिचर्समध्ये साम्य असूनही Mahindra च्या कार TATA मोटर्सवर मात का करु शकत नाहीत?
Tata Motors Vs Mahindra Auto: देशातील ऑटो क्षेत्रामध्ये काही अशा कंपन्यांचा समावेश आहे ज्या कैक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
Tata Motors Vs Mahindra Auto: रस्त्यावरून एका मिनिटात ये-जा करणारी वाहनं त्यातही कार पाहिल्या असता त्यामध्ये ठराविक कंपनीच्या कारची संख्या जास्त दिसते. भारतात यामध्ये TATA, Maruti आणि Mahindra च्या कारचा समावेश असतो. अशा या कंपन्यांकडून सादर करण्यात आलेल्या बहुविध मॉडेल्समुळं भारतातील ऑटो क्षेत्राला एक नवी उसळी मिळाली आहे. जागतिक स्तरावर भारताचं नाव उंचावताना दिसत आहे.
कार खरेदी, देशातील ग्राहकांची वाहन चालवण्याची पद्धत, देशातील रस्ते आणि एकंदर परिस्थिती पाहता अनेक कारप्रेमी डोळे झाकून काही ब्रँड्सना आवर्जून पसंती देताना दिसतात. यामध्ये महिंद्रा आणि टाटाच्या कार विक्रीमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळते. सध्याच्या घडीला भारतात मारुती सुझुकी, ह्युंडई आणि त्यामागोमाग टाटा, महिंद्राच्या कारला नागरिकांची पसंती मिळताना दिसत आहे. अनुक्रमे या कंपन्या पहिल्य़ा चार स्थानांवर आहेत. पण, येत्या काळात मात्र महिंद्राकडून टाटा कंपनीवर मात केली जाऊ शकते. पण, काही गोष्टी अशा आहेत ज्यामुळं टाटा कंपनीच्या कार मात्र कायमच सरस असल्याचं पाहायला मिळतं.
कोणती कार कोणत्या विभागात ठरतेय सरस?
कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये महिंद्राची एक्सयूवी300 ही कार आणि त्यासोबतच बोलेरो, बोलेरो नियो यांसारख्या कारची चांगली विक्री होते. पण, नेक्सॉन आणि पंच या टाटाच्या कारपुढे मात्र महिंद्राच्या कार फिक्या पडत आहेत. महिंद्राकडून मिडसाईज एसयुवीच्या विभागात कंपनीचा दबदबा दाखवला जातो. जिथं स्कॉर्पियो आणि एक्सयूवी700 सारख्या कारची बंपर विक्री होते. इथं टाटाच्या हॅरियर आणि सफारी या फेसलिफ्टेड कारना महिंद्राची टक्कर मिळत आहे.
हेसुद्धा वाचा : भारतातील 'या' ठिकाणी चक्क गोठलेल्या नदीवर चालता येतं; चुकून बर्फाला तडा गेला तर....
भारतात टाटा मोटर्सच्या हॅचबॅक विभागात टियागो, टियागो ईवी, ऑल्ट्रोज अशा कार विकल्या जातात. तर सेडान विभागात टिगोर, टिगोर ईवी आणि एसयूवी विभागात पंच, नेक्सॉन, नेक्सॉन ईवी, हॅरियर आणि सफारी अशा कारची विक्री केली जाते. टाटाकडून एसयूवी विभागात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या कारमध्ये अनेकांच्या खिशाला परवडतील असे दर निर्धारित केले जातात. तुलनेनं महिंद्राच्या कारच्या किमती जास्त असतात. याच कारणामुळं टाटाशी महिंद्रानं कितीही स्पर्धा केली तरीही अनेकांची पसंती TATA लाच असते.