Windows Microsoft Outage 2024: सायबर सिक्युरिटी क्षेत्रात काम करणाऱ्या 'क्राऊडस्ट्राइक' कंपनीमुळे शुक्रवारी जगभरामध्ये गोंधळ उडाला. जगभरातील लाखो मायक्रोसॉफ्ट विंडोज युझर्सला या कंपनीने पाठवलेल्या अपडेटमुळे मायक्रोसॉफ्टच्या सेवाच बंद पडल्या. यामुळे विमान कंपन्या, क्रेडिट कार्ड पेमेंट्स, आपत्कालीन सेवा, शेअर मार्केट, प्रसारमाध्यमे, लॉजिस्टीक्स अशा सर्वच क्षेत्रांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. जिथे जिथे मायक्रोसॉफ्टचा वापर मोठ्याप्रमाणात होतो तिथे हा फटका बसल्याचं पाहायला मिळालं. 


दोन गोंधळ आणि एकच माणूस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'क्राऊडस्ट्राइक'ने घातलेल्या गोंधळामुळे अनेकांना 2010 साली मॅकफीने घातलेला गोंधळ आठवला. या कंपनीने पाठवलेल्या अपडेटमुळे त्यावेळेस जगभरात विडोंज एक्सपी वापरणारे कंप्युटर बंद पडले होते, असं न्यूजबाईटने म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्यावेळेस मॅकफी कंपनीचा मुख्य तांत्रिक अधिकारी असलेली व्यक्ती आता पुन्हा 'क्राऊडस्ट्राइक'मुळे गोंधळ झाला त्यावेळेस 'क्राऊडस्ट्राइक' कंपनीचा संस्थापक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. म्हणजेच ही व्यक्ती प्रमुखपदी असताना दोन्ही कंपन्यांनी हा गोंधळ घातला. आता ही कमनशिबी व्यक्ती कोण असा प्रश्न पडला असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे, जॉर्ज कुर्त्झ!


पोस्ट चर्चेत


सोशल मीडियावर सध्या जॉर्ज कुर्त्झसंदर्भातील या विचित्र योगायोगाची पोस्ट व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकांनी यावरुन मजेदार प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. तुम्हीच पाहा ही व्हायरल पोस्ट....



गमावले 2 हजार 510 कोटी


दरम्यान, दुसरीकडे 'क्राऊडस्ट्राइक'ने घातलेल्या गोंधळामुळे जॉर्ज कुर्त्झच्या संपत्तीवर मोठी स्ट्राइक पडल्याचं दिसत आहे. शुक्रवारी झालेल्या या एका जागतिक स्तरावर गोंधळ उडवून देणाऱ्या प्रकारामुळे जॉर्ज कुर्त्झला तब्बल 300 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार तब्बल 2 हजार 510 कोटींचा फटका बसला आहे. जॉर्ज कुर्त्झची संपत्ती एका दिवसात 2510 कोटींना कमी झाली आहे. 'फोर्ब्स'ने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी जॉर्ज कुर्त्झची एकूण संपत्ती 3.2 बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी होती. मात्र शुक्रवारी 'क्राऊडस्ट्राइक' क्रॅश झाल्यानंतर जॉर्ज कुर्त्झची एकूण संपत्ती 2.9 बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी खाली घसरली. 


नेमका गोंधळ का उडाला?


जगभरातील अनेक सेवा ठप्प करणारा शुक्रवारचा अभुतपूर्व गोंधळ हा 'क्राऊडस्ट्राइक'च्या फॅल्कॉनमधून देण्यात आलेल्या ऑटोमॅटिक अपडेटमुळे उडल्याचं सांगितलं जात आहे. मोठ्या कंपन्यांकडून वापरल्या जाणाऱ्या सायबर सुरक्षा यंत्रणेमध्ये या अपडेटमुळे गोंधळ उडून यंत्रणा कोलमडून पडली. या एका अपडेटमुळे जगभरामध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोज वापरणारे कंप्युटर बंद पडले. 


जारी केला माफिनामा


सदर प्रकरणानंतर जॉर्ज कुर्त्झने एक माफीनामा जाहीर केला आहे. ज्या गोष्टीमुळे हा गोंधळ उडाला तिचा शोध लागला असून ती दुरुस्त करण्याचं काम सुरु आहे असं जॉर्ज कुर्त्झने भारतीय वेळेनुसार शनिवारी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं होतं. मात्र ते काहीही असलं तरी या प्रकरणाचा सर्वात मोठा आर्थिक फटका कोणत्या व्यक्तीला बसला असेल तर ती जॉर्ज कुर्त्झ हे मात्र नक्की!