Xiaomi ची Mi Credit सेवा, अवघ्या 10 मिनिटांत मिळवा 1 लाखांपर्यंत कर्ज
भारतीय मोबाईल बाजारात अव्वल क्रमांक मिळवल्यानंतर चायनीज मोबाईल निर्माता कंपनी शाओमीने भारतात Mi क्रेडिट सुविधा लॉन्च केलीय.
मुंबई : भारतीय मोबाईल बाजारात अव्वल क्रमांक मिळवल्यानंतर चायनीज मोबाईल निर्माता कंपनी शाओमीने भारतात Mi क्रेडिट सेवा लॉन्च केली आहे. एमआय क्रेडिट सर्व्हिसच्या माध्यमातून ग्राहकांना अवघ्या 10 मिनिटांत तब्बल 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. ज्या ग्राहकांना तात्काळ कर्जाची आवश्यकता असते अशा ग्राहकांसाठी शाओमीने एमआय क्रेडिट सेवा लॉन्च केली आहे. या सुविधेसाठी शाओमीने इंस्टंट लोन देणारी कंपनी KreditBee सोबत हातमिळवणी केली आहे.
'या' ग्राहकांना मिळणार कर्ज
शाओमीच्या Mi Credit सेवेमुळे ग्राहकांना तात्काळ कर्ज उपलब्ध होणार आहे. ज्या ग्राहकांच्या स्मार्टफोनमध्ये MIUI मोबाईल ओएस आहे अशा ग्राहकांना हे कर्ज मिळणार आहे. शाओमीच्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये MIUI ओएसची सुविधा देण्यात आली आहे. म्हणजेच तुमच्याकडे जर शाओमी एमआय ए1 फोन आहे तर तुम्ही कर्जासाठी अर्ज करु शकत नाही.
कसं मिळणार कर्ज?
शाओमी आणि KreditBee यांच्यात झालेल्या पार्टनरशिपनुसार ग्राहकांना 1 हजार रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. ज्या ग्राहकांच्या स्मार्टफोनमध्ये MIUI मोबाईल ओएस आहे आणि शाओमीचेच स्मार्टफोन्स आहेत अशा ग्राहकांना कर्ज मिळणार आहे.
कर्जावर किती व्याज?
शाओमीने कर्जाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे मात्र, केवायसीसाठी कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता आहे हे कंपनीने अद्याप स्पष्ट केलेलं नाहीये.
10 मिनिटांत मिळणार कर्ज
शाओमी कंपनीने सांगितले की, ग्राहकांना अवघ्या 10 मिनिटांत कर्ज उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. यासाठी KYC व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे.
किती टक्के व्याज?
KreditBee तर्फे सांगण्यात आलं आहे की, 1,000 ते 9,900 रुपयांचं कर्ज 15 दिवसांसाठी घेतल्यास 1.48 टक्के व्याज द्यावं लागणार आहे. तर, एका महिन्यापासून 90 दिवसांपर्यंत 10 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी 36 टक्के प्रति वर्ष या दराने व्याज द्यावं लागणार आहे.