YouTube चा Users ला इशारा! जाहिराती पाहा नाहीतर पैसे मोजा; नकार देणाऱ्यांवर करणार कारवाई
YouTube Warning To Users: जगातील सर्वात मोठी व्हिडीओ स्ट्रीमींग वेबसाईट असलेल्या युट्यूबने तिच्या वापरकर्त्यांना थेट इशारा दिला आहे. गुगलचा मालकी हक्क असलेल्या युट्यूबवर मागील काही काळापासून जाहिरातींचा कालावधी वाढल्याचं दिसत आहे.
YouTube Warning To Users: युट्यूबवर (YouTube) जाहिराती पाहणं आपल्यापैकी अनेकांना आवडत नाही. त्यामुळेच अनेकजण अॅड ब्लॉकरचा वापर करतात. अॅड ब्लॉकरचा वापर करुन व्हिडीओ पाहिल्यास व्हिडीओदरम्यान जाहिराती दिसत नाहीत. मात्र आता युट्यूबकडून अॅड ब्लॉकरविषयी (ad blockers) कठोर धोरण अवलंबलं जाणार आहे. कंपनीने यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला आहे. कंपनी सध्या एका फिचरवर अंतर्गत चाचण्या करत आहे. या फिचरमुळे युझर्सला अॅड ब्लॉकर वापरता येणार नाहीत. या फिचरच्या चाचणीसंदर्भातील वृत्त 'ब्लीपिंग कंप्यूटर'ने दिलं आहे.
तो स्क्रीनशॉट चर्चेत
काही युझर्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत. त्यामध्ये पॉप-अपसंदर्भातील इशारा युझर्सला दिल्याचं पहायला मिळत आहे. या स्क्रीनशॉटवरुन असं स्पष्ट होत आहे की जर युझर्सने अॅड ब्लॉकर्स वापरणं बंद केलं नाही तर 3 व्हिडीओंनंतर त्या युझरचा प्लेअर बॉक केला जाईल.
अॅड ब्लॉकर काढा नाहीतर पैसे द्या
जोपर्यंत युझर्स अॅड ब्लॉकर डिसेबल करत नाहीत तोपर्यंत त्यांना कंटेट अॅक्सेस करता येणार नाही. म्हणजेच यापुढे अॅड ब्लॉकर वापरुन युट्यूबवरील व्हिडीओ पाहता येणार नाहीत. 'द वर्ज'ने दिलेल्या वृत्तानुसार युट्यूबच्या प्रवक्त्यांनी, "आम्ही जागतिक स्तरावर एक छोटासा प्रयोग करत आहोत. ज्यामध्ये अॅड ब्लॉकर वापरणाऱ्या युझर्सला युट्यूबवरील जाहिरातींना परवानगी देण्याची किंवा थेट युट्यूब प्रीमियम वापरण्यास सांगण्यात येत आहे," म्हटलं आहे. म्हणजेच यापुढे जाहिरातींसहीत व्हिडीओ पहावे लागतील किंवा थेट युट्यूबची पेड सेवा म्हणजेच प्रीमियम सबस्क्रीप्शन घ्यावं लागणार आहे.
जाहिरातींचा कालावधी वाढला
अॅड ब्लॉकर्स हे युट्यूबच्या सेवा आणि अटींचं उल्लंघन करतात असं सांगितलं जातं. गुगलच्या मालकीच्या युट्यूबने अॅड ब्लॉकर्स वापरणाऱ्यांना वारंवार नोटिफिकेशन्स पाठवले जातील. ज्या माध्यमातून त्यांना जाहिरातींसाठी परवानगी देण्यास सांगितलं जाईल. मागील काही काळापासून युट्यूबवरील जाहिरातींचा कालावधी वाढला आहे. अनेक जाहिरातींना स्कीप बटणही दिलं जात नाही. पूर्वी अनेक जाहिरातींना स्कीप बटण दिलं जायचं. मात्र आता हे प्रमाण फार कमी झालं आहे. त्यामुळेच अनेकजण आता अॅड ब्लॉकरचा वापर करतात. मात्र आता यावरही युट्यूब निर्बंध आणण्याच्या तयारीत आहे.
प्रीमियम मेंबरशिप कितीला?
जाहिरातींशिवाय व्हिडीओ पाहण्यासाठी युट्यूबकडून प्रीमियम मेंबरशिप दिली जाते. ही मेंबरशिप घेतल्यास व्हिडीओ पाहताना जाहिराती दिसत नाहीत. युट्यूबच्या प्रीमियम मेंबरशिपची सुरुवात 129 रुपयांपासून होते.