ठाणे: भिवंडीच्या शांतीनगर परिसरात शुक्रवारी रात्री चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. तसेच ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राथमिक माहितीनुसार, येथील पिरानीपाडा परिसरात मतलो सरदार ऑफीसनजीक असलेली इमारत रात्री उशिरा अडीच वाजण्याच्या सुमारास कोसळली. ही इमारत बांधून फक्त आठ वर्ष झाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) पथक याठिकाणी दाखल झाले. 


सुरूवातीच्या काही तासांमध्ये अनेकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, यादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. तर आणखी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


भिवंडी-निझामपूर पालिकेचे आयुक्त अशोक रणखांब यांनीही घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ही इमारत आठ वर्षांपूर्वी बेकायदेशीरपणे बांधण्यात आली होती. या इमारतीच्या खांबांना तडे गेले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर पालिकेच्या पथकाने इमारतीची पाहणीही केली होती.


यानंतर इमारतीमधील सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आले होते. मात्र, काहीजण परवानगीशिवाय पुन्हा इमारतीमध्ये राहायला लागले होते. या दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असे अशोक रणखांब यांनी सांगितले.