भीषण! भिवंडीत इमारत कोसळली; दहाजणांचा मृत्यू
टेरेसच्या स्लॅबसह इमारत दबली गेली....
भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील, Bhiwandi भिवंडीत येथे पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. पटेल कंपाऊंड परिसरातील जिलानी इमारत कोसळल्यामुळं या भागात सध्या एकच गोंधळाची परिस्थिती उदभवली आहे. या इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दहाजणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना झाल्याचं लक्षात येताच टीडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. ज्यामागोमागच एनडीआरएफची टीमही या भागात दाखल झाली. सुरुवातीच्या आव्हानांनंतर बचावकार्याला वेग आणण्याचा प्रयत्न सुरु झालेला असता तरीही बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळं बचावकार्यात अडथळा येत आहे. असं असलं तरीही बचावकार्यादरम्यान तीन ते चार वर्षांच्या एका चिमुरड्या मुलाला आणि त्याच्या वडिलांनाही ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे.
कोसळलेल्या जिलानी इमारतीच्या चारही बाजूंनी इतर इमारती असल्यामुळं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जवळपास ३५-४० जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, ही इमारत अत्यंत दाटीवाटीच्या भागात असल्यामुळं घटनास्थळी जेसीबी, डंपर थेट घटनास्थळी पोहोचण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळं बचावकार्यात अडथळा येत आहे.
आतापर्यंत या दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखालून २५ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. शिवाय जखमींवर तातडीनं नजीकच्या रुग्णालयात उपचारही सुरु करण्यात आले आहेत. जिलानी इमारत दुर्घटनेमुळं पुन्हा एकदा धोकादायक इमारती आणि त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिलानी ही इमारतही अतिधोकादायक इमारतींपैकी एक असून, पालिकेकडून सदर इमारतीतील रहिवाशांना याबाबतची नोटीसही दिल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत एकट्या भिवंडीमध्ये मोठ्या संख्येनं धोकादायक इमारती आहेत. ज्यांमुळं आता या प्रकरणी पालिका प्रशासनाकडून आणि राज्य शासनाकडून कोणती कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.