`डॉन` आजाराने त्रस्त, चालण्यासाठी घ्यावा लागतोय आधार
इकबाल मधुमेह, रक्तदाब यांसारख्या गंभीर आजाराने त्रस्त झाला आहे.
कपिल राऊत, झी २४ तास, ठाणे : लोकांच्या मनात धडकी भरवणाऱ्या 'डॉन'ला आता चालायला देखील दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागत आहे. यावर तुमचा विश्वस बसत नसला तरीही, हेच खरं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा छोटा भाऊ इकबाल कासकर आजारी असल्याने त्याला उपचारासाठी सरकारी रूग्णालयात दाखल करण्याची याचिका त्याच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात केली आहे.
इकबाल कासकर याला हफ्ते वसुलीच्या तीन वेगवेगळ्या आरोपांखाली जानेवारी २०१८ मध्ये ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. इकबाल मधुमेह, रक्तदाब यांसारख्या गंभीर आजाराने त्रस्त झाला आहे. त्याचप्रमाणे त्याच्या यकृताला इजा झाल्यामुळे, हातापायांना सूज आल्याचे त्याच्या वकिलांचे म्हणणे आहे.
तुरूंगामधील जेजे, सेंट जॉर्ज किंवा सिव्हिल रूग्णालयात दाखल करण्याची शिफारस केली आहे. तरी देखील तुरूंग प्रशासनाने शिफारसीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कासकरच्या वकिलांनी केला आहे.
कासकरला निदान रमजान मध्ये तरी घरचे जेवण मिळावे आणि योग्य उपचारासाठी रूग्णालयात भर्ती करण्यात यावे, अशी मागणी त्याच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली आहे.