कल्याणमधील खड्डे सर्वात महाग; एक खड्डा बुजवण्याचा खर्च हजारोंच्या घरात
खड्ड्यांची नागरिकांना सजा, कंत्रांटांवर कोण मारतंय मजा?
आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण-डोंबिवली : खड्डंयामुळे तुम्ही आम्ही बेजार झालेलो असताना हेच खड्डे कुणाचेतरी खिसे चांगलेच भरतायत. कल्याण-डोंबिवलीकरांना पाठदुखी, कंबरदुखीसारख्या आजारांनी बेजार करणाऱ्या आणि काही नागरिकांचे बळी घेणारे हे खड्डे बुजवण्यासाठी केलेल्या खर्चाची रक्कम ऐकली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण यातला एकेक खड्डा भरण्यासाठी तब्बल २० ते २२ हजार रुपये खर्च महापालिका करते.
माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, आरटीआय कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कल्याण डोंबिवली महापालिकेने २७ गावं आणि टिटवाळा परिसरातील खड्डे बुजवण्यासाठी यंदा तब्बल १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यातून शहरातील ५ हजार २८३ खड्डे बुजवण्यात आले. आणि हे खड्डे भरण्यासाठी ठेकेदाराला ११ कोटी ९० लाख रुपये देण्यात आले.
एक खड्डा बुजवण्यासाठी २०-२२ हजारांचा खर्च म्हणजे अव्वाच्या सव्वा रक्कम वाटत असली तरी लोकांच्या जीवापेक्षा खड्ड्यांचं मोल ते कसलं असं महापालिकेला वाटत असावं. झी २४ तासने महापालिका अधिकाऱ्यांना याबाबत विचारलं तेव्हा महापालिका हद्दीतील ७० टक्के खड्डे बुजवल्याचा दावा त्यांनी केला. एक लाख ४५ हजार स्वेअर मीटर खड्डे भरण्यात आल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
कल्याण डोंबिवलीतल्या खड्ड्यांना चंद्रावरच्या खड्ड्यांची उपमा देऊन झाली, आणि चांद्रयानावरूनही सोशल मीडियावरून टीकेची झोड उठवली गेली. शहरात सत्तेत एकत्र असलेल्या भाजपने शिवसेनेवर टीकेची संधी सोडली नाही. कल्याण-डोंबिवलीतले खड्डे इतके महागडे असतील तर त्याची चर्चा तर होणारच. पण हे खड्डे भरताना आणखी कुणाचे खिसे भरले जातायत याचं गणित मात्र कुणी उलगडून सांगत नाहीये.