ठाणे: शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली. यावेळी महापालिकेतही सेनेला एकहाती सत्ता ठाणेकरांनीच दिली. तेव्हा, ठाणे पॅटर्नने महाराष्ट्रात भगवे सरकार आणूया असे वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. जनआशीर्वाद यात्रा बुधवारी ठाण्यात आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत आदित्य ठाकरे बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी म्हटले की, ठाणे जिल्हा हा जनआशीर्वाद यात्रेतील १०० वा जिल्हा आहे. त्यामुळे आता आपल्याला राज्यभरातही सेंच्युरीपेक्षा अधिक जागा जिंकायच्या आहेत. शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली. यावेळी महापालिकेतही सेनेला एकहाती सत्ता ठाणेकरांनीच दिली. त्यासाठी आपल्याला हाच ठाणे पॅटर्न प्रत्येक गावात, जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात न्यायचा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून येतील, असे आदित्य यांनी म्हटले. 


यावेळी आदित्य यांनी ठाणे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविषयीही भाष्य केले. खड्डे केवळ ठाण्यात नसून राज्यभरातील रस्त्यांवर खड्डे आहेत. आता टेंडर प्रक्रिया बदलण्यासह ठेकेदारांकडून रस्त्याची हमी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 
 
दरम्यान, सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपाची बोलणी सुरु आहे. शिवसेना १३५-१३५ च्या फॉर्म्युलावर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. तर भाजप शिवसेनेला ११० ते ११६ जागा देण्यास राजी आहे. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही ऐनवेळी युती तुटणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत युती होणारच, असे वेळोवेळी सांगितले आहेे. मात्र, रायगडमधील नाणार प्रकल्प आणि आरेतील कारशेडच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकण्याची शक्यता आहे.