Thane Crime : ठाण्यात एका व्यावसायिकाची भररस्त्यात हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाचा अखेर उलघडा झाला आहे. पोलिसांनी ठाण्यातील 55 वर्षीय व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक केली आहे.  दीड कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्येचा कट रचणारा आरोपी त्यावेळी मृत व्यावसायिकासोबत होता. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतीश पाटील असे हत्या झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. ते वर्तकनगर येथील देवदयानगर परिसरात राहत होते. तर याप्रकरणी पोलिसांनी कर सल्लागार भूषण पाटील आणि साथीदार नितीन पाटील यांना ताब्यात घेतले आहे. दीड कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारातून भूषण पाटील याने हत्येची सुपारी दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सतीश पाटील हे शनिवारी त्यांच्या कारने कासारवडवली भागातील ओवळा येथे आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत सतीश यांच्या हत्येची सुपारी देणारे भूषण आणि नितीन पाटील हे देखील होते.


कशी झाली हत्या?


सतीश पाटील हे ओवळा भागातील विहंग व्हॅली चौकात आले असताना, भूषण पाटील हा काही काम असल्याचे सांगून खाली उतरला. त्याचवेळी बाईकवरून दोनजण सतीश पाटील यांच्या कारजवळ आली. गाडीशेजारी पोहोचताच दोघांनीही तलवारीने सतीश पाटील यांच्यावर सपासप वार केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सतीश पाटील गंभीर जखमी झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. गंभीर जखमी झाल्याने सतीश पाटील यांचा  जागीच मृत्यू झाला. संशय येऊ नये म्हणून भूषण पाटीलने हल्लेखोरांकडून स्वत:च्या हातावर वार करून घेतले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.


असा झाला हत्येचा उलघडा


भूषण पाटील हा कर सल्लागार आहे. सतीश पाटील यांच्याकडून त्याने दीड कोटी रुपये उसने घेतले होते. पैसे परत करण्याची वेळ आल्यावर भूषणचे मन बदलले. भूषणने नितीनला सोबत घेतले आणि त्याच्याशी चर्चा केली. यानंतर दोघांनी सुपारी घेऊन हत्या करणाऱ्यांशी संपर्क साधला. आरोपींनी हल्लेखोरांना पैसे देऊन सतीश पाटील यांना मारण्यास सांगितले. त्यानंतर शनिवारी रात्री हल्लेखोरांनी सतीश पाटील यांच्यावर तलवारीने हल्ला करत त्यांची हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला असता त्यांना सतीश यांनी अनेकदा भूषण पाटील याच्याशी संभाषण केल्याचे समोर आलं. पोलिसांनी भूषणची चौकशी केली असता सुरुवातीला तो पोलिसांची दिशाभूल करत राहिला. मात्र त्याच्या या वक्तव्यावर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याची सखोल चौकशी केली. त्यानंतर भूषणने सतीश पाटील यांच्या हत्येची कबुली दिली.