प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : सध्या राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. हाच पाऊस अनेकांसाठी जीवघेणा ठरत आहे. अशीच एक अंगावर काटा आणणारी घटना भंडारा येथे घडली आहे. चालता चालता तीन वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. ही चिमुरडी सोसाट्याच्या वाऱ्याच्या तडाख्यात सापडली. अंगावर भिंत कोसळून तिचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी सायंकाळच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुरू असताना गावातीलच किराणा दुकानात खाऊ खरेदी करण्यासाठी  जात होती.  वाऱ्यामुळे भिंत कोसळल्याने चिमरडीचा मृत्यू झाला. लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे ही घटना घडली आहे.  देविका प्रकाश दिघोरे असे मृत मुलीचे नाव आहे.  


देविका गावातीलच एका किराणा दुकानात खाऊ खरेदी करण्यासाठी जात होती. वादळीवारा सुरू असताना रस्त्यालगत असलेल्या शेषराव ऋषी मेघराज यांच्या घराची मातीची भिंत तिच्या अंगावर कोसळली. यात ती गंभीररीत्या जखमी झाली. ही घटना नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ विटा बाजूला सारत जखमी देविकाला उपचारासाठी स्थानिक लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती स्थानिक लाखांदूर पोलिसांना होताच घटनास्थळी पोहचत घटनेचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.


जालना जिल्ह्यात तुफान पाऊस


जालना जिल्ह्यात वादळी वा-यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धाकलगाव, शहापूर बारसवाडा, सौंदलगाव या भागांत  जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने परीसरात गारवा पसरला. 


अवकाळी पावसाने सांगली जिल्ह्याला  झोडपून काढलंय


अवकाळी पावसाने सांगली शहरासह जिल्ह्याला झोडपून काढल आहे. विजांच्या कडकडाटासह  जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडला आहे. द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकरी हवालादिल झालाय.  मिरज,पलूस, विटा तालुक्यासह सांगली आणि मिरज शहरात धुंवाधार पाऊस पडला आहे. 


राज्यावर अवकाळी संकट कायम 


पुढील आठवडाभर मध्य महाराष्ट्र, कोकण या भागात  आठवडाभर पावसाचा इशारा देण्यात आलाय. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर, मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडेल. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झालंय. त्यामुळे अंदमान, निकोबार, केरळ, तामिळनाडू या भागात 12 मेपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाने हजेरी लावलीय. दरम्यान पावसाचा जोर कमी झाला असला तरी थांबलेला नाही. त्यातच आता बंगालच्या उपसागरात 8 मेपासून कमी दाबाचा पट्टा आहे. त्याचा परिणाम राज्यावर होणार आहे.