मुंबई : रणरणत्या उन्हात हजारो परप्रांतीय मजूर पायपीट करत आपापल्या मूळ गावी परतत आहेत. मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई इथून मजुरांचे जथ्थेच्या जथ्थे मुंबई - आग्रा महामार्गावर सहकुटुंब चालत जातानाचं भीषण चित्र इथं पाहायला मिळत आहे. दिवसभर चालायचं, दुपारी थोडी विश्रांती घ्यायची आणि संध्याकाळी-रात्रभर पायपीट करायची. जिथं मिळेल तिथं आणि कुणी देईल ते खायचं, असा त्यांचा दिनक्रम आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या कंपनीत हे मजूर काम करत आहेत, त्या कंपनीने वाऱ्यावर सोडले आहे. कंपनीने कोणतीही सोय आम्हाला उपलब्ध करुन दिलेली नाही, असा आरोप गावी निघालेल्या परप्रांतीय मजुरांनी केला आहे. घरात खायला नाही, मग येथे राहून तरी काय उपयोग. येथे मरायचे असेल तर चालत  जाऊन गावी पोहोचायचा मार्ग निवडला आहे. मरण हे कायम आहे. जर वाटेत मरण आले तरी चालेल. पण येथे थांबायचे नाही, असा निर्धार या मजुरांनी घेतला असून ते पायपीट करत परतीकडे निघालेले आहेत. 


नागपूर जबलपूर महामार्गावरही मजूर परतीकडे


दरम्यान, हजारो मजूर मिळेल त्या वाहनानं महामार्गावरून शेकडो किलोमीटरचा प्रवास करत आपल्या मूळ गावाच्या दिशेनं निघाले आहेत. नागपूर जबलपूर महामार्गावर असे अनेक मजूर दिसतायत. यापैकी काहींनी चक्क सायकलवरून सहकुटुंब शेकडो किलोमीटरचा प्रवास केला आहे. मोहम्मद सिराज नावाचा मजूर त्यापैकीच एक. आपली पत्नी आणि मुलाला घेऊन तो सायकलवरुन हैदराबादहून निघाला आहे. हैदराबादमध्ये सुतारकाम करणाऱ्या मोहम्मदकडची जमापुंजी संपीलय. आता त्याला उत्तर प्रदेशातलं सुल्तानपूर गाव गाठायचे आहे. रणरणत्या उन्हात बायका-मुलासह सायकलवरून १४०० किलोमीटरचा प्रवास मोहम्मद यांने केला आहे.