अनिरुद्ध दवाळे, अमरावती : अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यूसह साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, थंडीतापाची लाट आली असून जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी जागा नसल्याने एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार केले जात आहे. अनेक रुग्णांना चक्क बेडच्या खाली झोपवून त्यांच्यावर उपचार केले जात असल्याचे विदारक वास्तव आहे. सामान्य रुग्णालयातील सर्वच वॉर्डमध्ये रुग्णांची गर्दी झाली असून वॉर्ड क्रमांक पाच तसेच अतिदक्षता विभागात डेंग्यू, मलेरिया, हिवताप रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व वॉर्ड रुग्णांनी खच्चून भरले असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिस्थिती अतिशय विदारक आहे. रुग्णालयातील गर्दी पाहता रुग्णालय प्रशासनाने चक्क खाली गाद्या टाकून रुग्णांना त्यावर झोपवले आहे. आपल्या रुग्णाला बेड मिळावा यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये स्पर्धा लागल्याचेही जिल्हा सामान्य रुग्णालयात पहायला मिळत आहे. 


अमरावती जिल्ह्यात डेंग्यूचा कहर केला असून जिल्ह्यात आतापर्यंत 2067 संशयित रुग्ण आढळले असून आतापर्यंत 268 पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये जिल्ह्यात आतापर्यंत 12 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी यांनी दिली आहे.