मार्डच्या हॉस्टेलमध्ये महिला डॉक्टरचा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न
खोलीचा दरवाजा आतून लावलेला होता.
नागपूर: स्वतःचा गळा कापून महिला डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नागपूरच्या शासकीय मेडिकल महाविद्यालयात घडली आहे. अश्विनी शिंदे - राउत असे या महिला डॉक्टरचे नाव आहे. २६ वर्षीय डॉक्टर अश्विनी या मार्डच्या हॉस्टेलमध्ये राहतात. आज सकाळी बराच वेळ त्या खोलीबाहेर आल्या नाहीत. तेव्हा दुसऱ्या महिला डॉक्टरांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला.
मात्र, खोलीचा दरवाजा आतून लावलेला होता. कोणीही प्रतिसाद देत नसल्याने कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला. त्यावेळी अश्विनी शिंदे पलंगावर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या. त्यांच्या गळ्यावर जखमेचे घाव होते, यामधून बराच रक्तस्त्राव झाला होता.
अश्विनी शिंदे यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. अश्विनी शिंदे या मुळच्या बीड जिल्ह्यातील असून पदव्युत्तर शिक्षणासाठी त्या नागपुरात होत्या. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.