बाप की हैवान! दोन महिन्याच्या पोटच्या मुलीला विकून बाईक आणि म्युझिक सिस्टीमची खरेदी
नागपूरात वडिलांनी दोन महिन्याच्या मुलीची विक्री करून बाईक, म्युझिक सिस्टीम खरेदी केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना नागपुरात उघडकीस आली आहे.
नागपूर : वडिलांनी दोन महिन्याच्या मुलीची विक्री करून बाईक, म्युझिक सिस्टीम खरेदी केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील व विक्रीसाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेला अटक केली आहे.
उत्कर्ष दहिवले असे अटक करण्यात आलेल्या वडिलांचे नाव आहे. तर उषा सहारे असे अटकेतील मध्यस्थी करणाऱ्या महिला आरोपीचे नाव आहे. आरोपी उषा ही रामटेक मधील खाजगी अनाथआश्रम मध्ये काम करते उत्कर्ष नळफिटिंगचे काम करतो.उत्कर्षने 1 लाख रुपयात मुलीला विकले.
पोटच्या मुलीला विकण्यास उत्कर्षच्या पत्नीचा विरोध होता. उत्कर्षने पत्नीलाही जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीच्या आईचा नाईलाज झाला. अखेर 15 एप्रिलला मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठत पतीने आपल्या दोन महिन्याच्या मुलीची विक्री केल्याचे सांगितले.
याप्रकरणी उषा नावाच्या महिलेने मध्यस्थी केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मुलीची विक्री केल्यानंतर उत्कर्षला सत्तर हजार रुपये मिळाले तर उषा नावाच्या मध्यस्थी करणाऱ्या आरोपी महिला 30 हजार रुपये मिळाले होते.
पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केल्यानंतर आरोपी वडिलांनी मुलीची विक्री करून दुचाकी ,म्युझिक सिस्टिम आणि दिवाण अशा एशोआरामच्या वस्तू खरेदी केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. प्रकरणाची पुढील चौकशी पोलीस करीत आहेत.