नागपुरात अवैध वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात पहिला एफआयआर
अवैध वृक्षतोडीविरोधात मनपाचे कठोर पाऊल
नागपूर- महानगरपालिकेतर्फे शहरात होणाऱ्या अवैध वृक्षतोडी विरोधात कठोर पाउल उचलणे सुरु केले आहे.आता अवैध वृक्षतोडप्रकरणी पहिला एफआयआरही दाखल झालाय.प्रतापनगर येथील नवनिर्माण सोसायटी येथे आंब्याचे झाड कापल्याप्रकरणी यशवंत मधुकर शेंडे यांच्या विरोधा प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
नागपूरची ग्रीन सिटी म्हणून देशात वेगळी ओळख आहे.नागपूर शहराचे सौंदर्यीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने नागपुरात मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला झाडांची लागवड करण्यात आलीय.मात्र वृक्षाची अवैध कटाई करणाऱ्या टोळी मार्फत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याची तक्रारी आल्या होत्या.त्यानंतर महापौर दयाशंकर तिवारी यांच्या निर्देशानुसार प्रतापनगर पोलीस स्टेशन येथे अवैधरित्या वृक्ष तोड करणाऱ्यांविरोधात उद्यान विभागातर्फे पहिला एफआयआर दाखल करण्यात आला आहे.प्रतापनगर येथे नवनिर्माण सोसायटीत विना परवानगी आंब्याचे झाड कापल्याप्रकरणी यशवंत मधुकर शेंडे यांच्या विरोधात मनपाचे उद्यान निरीक्षक अनंता नागमोते यांनी प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ कलम २१ अन्वये तक्रार दाखल केली. यशवंत शेंडे यांनी मनपाची परवानगी न घेता ६९ इंच जमिनीलागत गोलाई असलेले एक आंब्याचे झाड बंजारा मजुरांकडून कापून घेतले.
सध्या शहरात बंजारा ही अवैध झाड कापणारी मजूरांची टोळी सक्रिय आहे.ही टोळी शहरात मानेवाडा शेषनगर रोड येथे वास्तव्यास आहे, असे उद्यान निरीक्षक अनंता नागमोते यांनी तक्रारीत म्हटले आहे. गेल्या पाच वर्षात शहरात ५ हजार २७४ झाडं कापण्यात आली आहेत.त्यामुळे महापालिकेच वृक्षतोडीविरोधात हे पाऊल महत्वाचे मानले जात आहे.