Nagpur Flood: पुराचे पाणी पंपाने बाहेर काढण्याच्या प्रयत्नात वीजेचा शॉक; आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू
Nagpur Flood : नागपुरात दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळं शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरपरिस्थितीमुळे नागपुरात आतापर्यंत पाच लोकांचा मृत्यू झाला आहे.
Nagpur Flood : नागरपुरमध्ये (Nagpur News) दोन दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळल्याने शहरात एकच हाहाकार उडाला होता .मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं. नागपूरमध्ये केवळ तीन तासांमध्ये 110 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं त्याचं पाणी शहरातील अनेक भागांमध्ये शिरलं. मुसळधार पावसामुळं संपूर्ण जनजीवन विस्कळित झाल्याचं पाहायला मिळालं.
ढगफुटीसदृश पावसामुळं नागपुरात मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील झाली आहे. या पावसामुळे नागपुरात पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या पुरानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास दोन महिलांचे मृतदेह आढळले आहेत. मीरा पिल्ले आणि संध्या ढोरे अशी या मृत महिलांची नावे आहेत. घरात झोपत असतानाच या दोघींचा पुराच्या पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याचं समजतं आहे. तर एका अज्ञात पुरुषाचाही मृतदेह नागपूरातील सीताबर्डी भागामध्ये असलेल्या नाग नदीच्या प्रवाहात आढळला आहे. मात्र अद्यापही या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. तर 52 वर्षीय संजय गाडेगावकर यांचा अजनी परिसरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे.
विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू
अशातच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या पुरामध्ये कृष्णकुमार बारखंडी या 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. धंतोली परिसरातील एका हॉटेलच्या बेसमेंटमध्ये पाणी भरलेलं असताना इलेक्ट्रिक पंपाच्या सहाय्याने पाणी बाहेर काढत असताना विजेचा धक्का लागून या तरुणाचा मृत्यू झाल्याचं तपासात समोर आलं आहे.
500 हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात यश
स्थानिक नागरिक, पोलीस तसेच एनडीआरएफच्या मदतीने पूरग्रस्त भागातील नागरिकांना वाचवण्यात यश आलं आहे. आतापर्यंत 500 हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
राज्य सरकारकडून मदत जाहीर
दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून नागपुरातील पुराची दखल घेण्यात आली.नागपूरचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुरग्रस्त भागातील नागरिकांसाठी प्रत्येकी 10 हजार रुपये मदत जाहीर केली आहे.