अनिरुद्ध दवाळे, अमरावती : अमरावतीच्या राजापेठ चौकातील उड्डाणपुलावर 12 जानेवारीला मध्यरात्री आमदार रवी राणा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. या पुतळ्यासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या आमदार रवी राणा यांनी घेतल्या नव्हत्या. त्यामुळे हा पुतळा वादाच्या भोवर्‍यात अडकला होता. काल 16 जानेवारी रोजी मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने हा पुतळा काढला आहे.  त्यानंतर अमरावतीमध्ये राजकारण ढवळून निघाले आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने प्रशासनावर दबाव आणून हा पुतळा काढल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर राणा दांपत्याने जोरदार टीका केली होती. परंतु आता आमदार रवी राणा यांचा सूर बदलला की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे? कारण काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या आमदार रवी राणा यांनी आज मात्र भाजपला लक्ष्य केलं आहे. अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता असताना देखील त्यांनी पुतळा बसवायला परवानगी दिली नाही असा आरोप रवी राणा यांनी केला आहे. यासंदर्भात मी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारणा करणार असल्याचीही माहिती आमदार रवी राणा यांनी दिली.


'ज्या व्यावसायिकांकडून लाच मिळते त्यांच्यासाठी अमरावती महानगरपालिका रात्री-बेरात्री बैठका घेऊन परवानगी देते. परंतु शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी परवानगी द्यायला अमरावती महानगरपालिकेकडे वेळ नाही' अशी गंभीर टीकाही राणा यांनी केली. दरम्यान येत्या शिवजयंतीला शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवणार असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यासाठी पालकमंत्री, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी रीतसर परवानगी द्यावी अशी मागणीही आमदार रवी राणा यांनी केली आहे.


तीन नगरसेवक देणार राजीनामा....


या प्रकरणानंतर अमरावतीतील राजकारण तापले असून, आमदार रवी राणा यांच्या पक्षाचे तीन नगरसेवक राजीनामा देणार आहे. महापौर आणि महानगरपालिका आयुक्तांकडे तीनही नगरसेवक राजीनामा देणार आहेत.