नागपूर : जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेकडून नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासह विविध ठिकाणांची रेकी करण्यात आली होती. ही रेकी करणाऱ्या दहशतवादयाची माहिती नागपूर पोलिसांना मिळाली आहे.     


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीर खोऱ्यात पकडलेल्या जैशच्या दहशतवाद्याकडून सुरक्षा यंत्रणांना या रेकीची माहिती मिळाली होती. जैश ए मोहम्मदचा दहशतवादी रईस अहमद शेख याने हि रेकी केली होती अशी माहिती समोर आली आहे.


नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, रेशीमबाग आणि डॉ. हेगडेवार स्मृती भवनातील काही फोटो काढून रईस शेख याने आपल्या पाकिस्तानातील म्होरक्याला पाठविले होते. मात्र, हे फोटो लांबून काढल्यामुळे ते स्पष्ट दिसत नव्हते.


हा दहशतवादी संघाच्या महाल इथल्या परिसरात भरपूर पोलीस असल्याने जवळ जाऊ शकला नाही. आपण फार जवळ गेलो तर पोलीस अटक करतील अशी त्याला भीती वाटत होती म्हणून तो तेथून निघून गेला. नागपुरात कुणीही त्याला मदत केली नव्हती असा दावाही आयुक्त अमितेश कुमार यांनी केला. तसेच, केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्याचा ताबा नागपूर पोलीस घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले.