माऊलींची पालखी दिवेघाटाची खडतर वाट ओलांडून सासवडच्या दिशेने रवाना
सर्वात खडतर टप्पा असणाऱ्या दिवेघाटाची वाट आज हजारो वारकऱ्यांनी पार केली.
माऊलींच्या पालखीतला सर्वात खडतर टप्पा असणाऱ्या दिवेघाटाची वाट आज हजारो वारकऱ्यांनी पार केली. यावेळी वरुणराजाच्या हजेरीमुळे वारकऱ्यांचा उत्साह दुणावला होता. निसर्गाने मुक्त उधळण केलेला दिवेघाट आणि तिथून वाट काढत विठुरायाच्या दर्शनाला निघालेला वारकरी हे नयनरम्य दृश्य आज पुन्हा एकदा पाहायला मिळाले. दिवेघाटाचा अवघड टप्पा पार करताना वारकऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनीही साथ दिली.
तर दुसरीकडे पाऊले हळू हळू चाला, मुखाने हरिनाम बोला, पांडुरंग हरी, वासुदेव हरी असा विठुनामाचा गजर करत मुक्ताईनगरमधून संत मुक्ताईच्या पालखीनं प्रस्थान ठेवले. या पालखीचे बीडमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. मुक्ताबाई दोन दिवस बीड मुक्कामी असतील. मुक्ताईची पालखी वारीसाठी तब्बल सातशे किमीचं अंतर पार करते. मुक्ताबाईच्या पालखीत जवळपास दीड हजार वारकरी सहभागी झालेयत. बीड जिल्ह्यात मुक्ताबाईच्या पालखीचे चार मुक्काम असतात. त्यापैकी शहरात दोन मुक्काम असतात. शहरात सकाळी जालना रोडवर मोठ्या उत्साहात पालखीचं आणि वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले.