पुणे: पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव निवडून आलेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या विनोद नढे यांचा ४७ मतांनी पराभव केला. यानिमित्ताने अनेकजण सध्या राहुल जाधव यांच्या रिक्षाचालकापासून ते महापौरपदापर्यंतच्या थक्क करणाऱ्या प्रवासाची चर्चा करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पिंपरी-चिंचवडचे नवे महापौर राहुल जाधव यांचा राजकीय प्रवास अचंबित करणारा आहे. ज्या शहरात ते कधीकाळी रिक्षा चालवायचे, त्याच शहराचे महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. 


चिखली गावच्या जाधववाडी परिसरात एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांनी केवळ दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीच्या काळात कुटुंबीयांना आर्थिक हातभार लागावा, यासाठी ते रिक्षा चालवत असत. 


१९९६ ते २००३ या काळात ते रिक्षाचालक म्हणून काम करायचे. २००६ पासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी अनेक राजकीय टप्पे यशस्वीपणे पार केले. २०१७मध्ये भाजपकडून ते महापौरपदाच्या शर्यतीत होते. त्यावेळी नितीन काळजे महापौर झाले आणि त्यांची संधी हुकली होती. मात्र, यावेळी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने त्यांना पुन्हा संधी दिली आणि ते निवडून आले.