पुणे: संभाजी महाराजांविषयी अवमानकारक उल्लेख असलेल्या सर्वशिक्षा अभियानातल्या पुस्तकावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह उल्लेख असल्याने त्याविरोधात संभाजी ब्रिगेडने आंदोलनाचा इशारा दिला होता. आमदार जितेंद्र आव्हाडांनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती. त्यानंतर सर्व शाळांमधल्या  'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकाच्या सर्व प्रती ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आलेत. 


सर्वशिक्षा अभियानातल्या दुसऱ्या पुस्तकात संत तुकारामांविषयीही आक्षेपार्ह उल्लेख होता.  यासंदर्भात डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. हे सात दिवसांत याबद्दल अहवाल देतील, तोपर्यंत पुस्तकाला स्थगिती दिल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी दिली आहे. दरम्यान, या पुस्तकाच्या लेखिका शुभा साठे,  प्रकाशक आणि महाराष्ट्र विद्या प्राधिकरण विभागातील अधिकाऱ्यांवर परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर पोलीस ठाण्यात संभाजी ब्रिगेडच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.