पुणे: भीमा कोरेगाव येथील विजयाला २०१ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पुण्यात 'भीमा कोरेगाव संघर्ष महासभा' आयोजित करण्यात आली आहे. या सभेला भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे संबोधित करणार आहेत. येत्या ३० डिसेंबर रोजी हा कार्यक्रम होईल. या सभेला पुणे पोलिसांनी अजूनपर्यंत परवानगी दिलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भीम आर्मीचे पुण्यातील जिल्हाध्यक्ष दत्ता पोळ यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या सभेनंतर ३१ डिसेंबर रोजी चंद्रशेखर आझाद हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना ‘आंबेडकरी चळवळ’ या विषयावर संबोधित करतील.


पेशवे आणि इंग्रजांमध्ये १ जानेवारी १८१८ साली झालेल्या लढाईत महार बटालियनने निर्णायक भूमिका बजावली होती. महार बटालियनच्या पराक्रमामुळे पेशव्यांचा सैन्याचा दारुण पराभव झाला होता. महार सैनिकांच्या विजयाचे प्रतीक म्हणून भीमा-कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारण्यात आला होता. या लढाईला यंदा २०१ वर्ष पूर्ण होणार आहेत.


गेल्यावर्षी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय जमला असताना दंगल उसळली होती. काही समाजकंटकांनी जोरदार दगडफेक सुरू केली. यामध्ये अनेकजण जखमी झाले होते. तसेच राहुल फटांगडे या तरुणाचा मृत्यू झाला होता. राज्यभरात या घटनेचे मोठे पडसाद उमटले होते.