कोल्हापूर: गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर शहराला मोठा फटका बसताना दिसत आहे. काही वेळापूर्वीच येथील येळगाडी-शाहुवाडी या मार्गावरील रस्ता खचल्याचा प्रकार घडला. त्यामुळे आता या मार्गावरील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. अवजड वाहनांना या मार्गावरुन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ही वाहतूक दुसऱ्या रस्त्याने वळवण्यात आली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कोल्हापुरात पावसाची संततधार सुरुच आहे. जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी ३८ फूट ४ इंचावर आलीय. पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूट तर धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. कोल्हापूर शहरातील गायकवाड वाड्यापर्यंत पंचगंगा नदीचे पाणी पोहोचले. याशिवाय, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील ६२ बंधारे पाण्याखाली आलेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाच राज्यमार्ग आणि १३ जिल्हामार्ग बंद आहेत. कोल्हापुरातल्या पूरात आतापर्यंत तिघांचा बळी गेलाय. पूराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.