पुणे: मुंबई-पुणे मार्गावरील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये बुधवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत तब्बल २०० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुणे, पिंपरी आणि खडकी कॅन्टोन्मेंट केंद्रावरून अग्निशमन दलाच्या तब्बल ४० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. गेल्या तीन तासांपासून त्यांच्याकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे आतापर्यंत जवळपास १०० झोपड्या अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, आग विझवताना झोपड्यांमधील सहा ते सात सिलेंडर्सचा स्फोट झाल्याने आग आणखीनच भडकली. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांपुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सध्या अग्निशमन दलाचे जवान झोपड्यांतील ज्वलनशील पदार्थ बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आगीमुळे संपूर्ण परिसरात सध्या धुराचे मोठे लोट उठताना दिसत आहेत. नदीकाठाला लागून असलेल्या या गल्लीपर्यंत पोहचण्यात अग्निशामक दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत़. त्यासाठी या परिसरातील वाहतूक सध्या रोखण्यात आली आहे. पिंपरीकडून पुण्याकडे येणारा खडकीच्या पुढचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. वाकडेवाडी पुलाखालील रस्ता आणि संगमवाडीकडे जाणारा रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.


स्थानिक तरुणांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व ही आग शेजारी झोपड्यांमध्ये पसरु नये, यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत़.